पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५१)

शिक्षण मिळत असले, व घरी जर त्याच्या उलट प्रकार असला, तर त्यापासून कांहीं एक फायदा होणार नाही. पण गृहशिक्षण जर चांगले असेल तर मात्र शिक्षकाचे काम ( शील बनविणे ) सुलभ होते. परंतु अशी स्थिति बहुतकरून फारशी नसते. पुष्कळ आईबापांना मुलांस शिस्त कशी लावावी, सद्गुणांची त्यांना आवड कशी लावावी, त्यांचे वर्तन नीतिबद्ध कसे करावें वगैरे गोष्टी माहीत नसतात. भलत्याच उपायांनी आईबाप मुलांस शिस्त लावू पहातात. ते एखादी कृति करावी म्हणून मुलांत आज खाऊ देतात व उद्यां तीच कृति करण्याकरितां मार देतात; या कारणामुळे सत्कृतीचे खरे महत्व मुलांना समजत नाही.
 शील व शाळा:- गृहशिक्षण जरी वर सांगितल्याप्रमाणे वाईट प्रकारचे असले तरी शिक्षकाने निराश होण्याचे कारण नाही; कारण, शाळेत येणाऱ्या मुलांपैकी फार थोडी मुले शाळेत येण्यापूर्वी बिघडलेली असतात. शिवाय मुलांचे मन मेणासारखें लवचिक असते; यामुळे त्यांस वळण लावणे सुलभ जातें.
 शाळेत शील बनविण्याचे काम पूर्ण होत नाही; त्याचा पाया मात्र घातला जातो. शील पूर्ण बनविणे हे काम मुलांनीच केले पाहिजे. असो. आतां शिक्षकास शील बनविण्याच्या कामी कोणकोणत्या साधनांचा उपयोग करितां येण्यासारखा आहे ते पाहूं.
 पहिली गोष्ट– अध्यापन. महाभारत,रामायण यांतील बोधपर गोष्टींपासून बरेंच नैतिक शिक्षण मिळते. प्रत्यक्ष सत्कृति करावयास लावणे यापासून जसा उपयोग होतो तसा वर सांगितलेल्या बोधपर गोष्टींपासून होत नसतो हे मात्र या ठिकाणी सांगितले पाहिजे.
 दुसरी गोष्ट- शिस्त. याविषयी पुढील भागांत सविस्तर विवेचन केलेले आहे.

 तिसरी गोष्ट- मुलांस चांगल्या संवयी लावणे. याविषयी मागच्या भागांत थोडाबहुत उल्लेख केलेला आहेच. निरनिराळे सद्गुण व ज्या हेतूंमुळे मुले कृति करण्यास प्रवृत्त होतात. ते हेतु यांच्या स्वरूपाची शिक्षकाने अगोदर माहिती करून घेतली पाहिजे.