पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५०)

देऊन एकवेळ एखादे मुलाने या इच्छेवर दाब ठेविला की पुन्हा दुसरे प्रसंगी असेंच करण्याकडे त्याची प्रवृत्ति होते.
 शील व स्वभाव- स्वभाव या शब्दाचा उपयोग बऱ्याच व्यापक अर्थाने केलेला आढळतो. एखादे व्यक्तीचे ठायी असणारे विशेष दर्शविण्यासाठी स्वभाव हा शब्द योजितात. या शब्दाचा खरा अर्थ जरा संकुचित आहे. विकसित-नैसर्गिकवृत्ति म्हणजेच स्वभाव. स्थैर्य अथवा चिरस्थायी गुण हे स्वभावांतील मुख्य तत्त्व होय. स्वभाव कधीहि बदलत नसतो. प्रवर्तक व्यापारदर्शक अशा विशेष अर्थीहि स्वभाव हा शब्द योजण्याचा प्रघात आहे. काहीएक ठराविक वर्तन करण्याची प्रवृत्ति म्हणजे स्वभाव ही मग स्वभावाची व्याख्या होते. अमुक एका माणसाचा स्वभाव मोठा विचित्र आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हां त्याचा अर्थ असा की, त्या माणसाचे हेतुहि विचित्र, संवयाहि विचित्र, कृति व कल्पनाहि त्याच जातीच्या. असो. सुस्वभावास शील असें म्हणतात. कसलेली व न बदलणारी प्रवर्तकशक्ति व तदंतर्गत भावना व विचार इत्यादि सर्व काही शील या शब्दाने दर्शविले जाते. अमुक एका माणसाचे शील चांगले आहे, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, त्या माणसास आपले मनाचे संयमन करितां येते:-- भावना, आचार व विचार सर्व त्याच्या कह्यांत आहेत; व उद्योग, व्यवस्थेशीरपणा, धैर्य, सत्य, न्याय, परोपकारबुद्धि इत्यादि सर्व चांगले चांगले गुण त्याचे अंगी आहेत.
 प्रवर्तकशक्तीचे उच्च स्वरूप दर्शविणारे गुण लहान मुलांचे ठायी दृष्टीस पडतात. कृति करण्यापूर्वी काही मुलें थांबतात व थोडा विचारहि करितात; तसेंच दुःख वगैरे भावनाहि आंतल्या आंत दाबण्याचा मुलें यत्न करितात, ही गोष्ट पुष्कळांचे पाहण्यांत आली असेलच.
 शील व गृहशिक्षणः--शाळेतील शिक्षणापेक्षां गृहशिक्षणाचाच शील बनविण्याच्या कामी विशेष उपयोग होतो. शाळेंत उत्तम