पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४९)

नेहमी इकडे तिकडे भटकत असते. एका ठिकाणी फारसे रहात नसते. आता हे लक्ष ज्या गोष्टींमुळे एके ठिकाणी रहात नाही त्या गोष्टी मार्गातून दूर केल्याने, ज्या गोष्टीचा विचार कर्तव्य आहे, तिचे ठायीं अवधानशक्ति एकाग्र करितां येते; अर्थात् विचारहि त्याच ठिकाणी एकाग्र होतो; म्हणजे त्याचे संयमन होते. भावनांचे संयमनांत विचाराचें संयमन येते व विचार व भावना या दोहोंचें संयमन कृतीचे संयमनांत येतें ही गोष्ट येथे सांगितली पाहिजे. बोध व कल्पना यांशी भावनांचा अगदी निकट संबंध आहे. संवेदन झाल्याविना बोध वगैरे होत नाही हे पूर्वी सांगितलेच आहे. ( संवेदन एक भावनाच होय.) तेव्हां भावनांवर दाब ठेविल्याने बोध वगैरेवरहि दाब ठेवल्यासारखेच होते. स्नायूंचें चलन दाबांत ठेविल्याने भावनांचा जोर कमी होतो, हे वर सांगितलेच आहे. परंतु भावनांचें संयमन करण्याचा उत्तम मार्ग म्हटला म्हणजे ज्या कारणांमुळे भावना उत्पन्न होतात त्यांकडे विचारास जाऊ न देणे हा होय. आणखी असें की ज्या अर्थी भावना व विचार कृतींस कारणीभूत होत असतात, त्या अर्थी कृतीवर दाब ठेविल्याने भावना व विचार यांवर दाब रहातो. विचार व भावनाहि शुद्ध ठेवण्याविषयी जपावें. म्हणजे त्यांचे परिणत फल जी कृति तीहि शुद्धच राहील. ('बीजा ऐशी फळे उत्तम की अमंगळे'). या सर्व विवेचनावरून आपणांस असें म्हणता येईल की अवधान ताब्यांत ठेविल्याने सर्व मन जवळ जवळ ताब्यात येईल. अवधानावर दाब ठेवणे सोपे नाही. तरीपण पुनरावृत्तीने हे काम हळू हळू सुलभ वाढू लागते. आरंभी आरंभी भावनांचा पगडा मुलांचे मनांवर होतो व विचारशक्तीचे काहीएक चालत हे खरे; तरी पण एकवार यत्न केला म्हणजे सर्व काही सुलभ वाढू लागते. क्रिया-प्रवृत्तिकारक हेतूंपैकी उच्च हेतूंचा अंमल नीच हेतूंवर होण्यासाठी आपण नेहमी झटावें. आरंभी आरंभी जरा त्रास होतो; परंतु हेहि काम पुनरावृत्तीने सुलभ वाटू लागते. खादाडपणाचे दुष्परिणामांकडे लक्ष