पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४८)

प्रवर्तकशक्तीची पूर्ण वाढ होण्यास या शक्तीसहि प्रत्यक्षं चलन मिळाले पाहिजेच. आपले हातून विचारपूर्वक कृति एकदम होत नसते; सहेतुक कृति मात्र होणे शक्य असते. भिन्न भिन्न हेतु मनासमोर येतात व आपले मोहजाल मनावर घालितात. त्या सर्वांशी झगडावे लागते, सर्वांचे म्हणणे काय ते ऐकून घ्यावे लागते, नंतर निवड होते, व मग विचारपूर्वक कृति होते. मनापुढे येणारे हेतु जर सजातीय असतील तर मात्र कृति त्वरित होते, नाहीतर बराच वेळ लागतो. कोणतीहि कृति करण्यापूर्वी थांबावयाचें व नीट विचार करावयाचा अशी स्थिति झाली म्हणजे प्रवर्तकशक्ति पूर्ण विकास पावली असे समजावे. ही स्थिति येण्यास बराच अनुभव यावा लागतो. घाईघाईने केलेल्या कृतीचे दुष्परिणाम काय होतात याचा अनुभव आल्याविना आपले अंगी सावधपणा येत नसतो. निश्चय ही संज्ञा आपण ज्यास देतो तो गुणहि प्रवर्तकशक्तीचा उच्च विकासदर्शकच होय. पूर्वी विचार झाल्याशिवाय निश्चय होत नसतो, व निश्चय झाला म्हणजे कृति करण्याची पूर्ण तयारी झाली असे समजावें. हेतूंशी झगडणे व विचारपूर्वक कृति करणे म्हणजे मनावर दाब ठेवणे होय.
 मनावर दाब ठेवणे यांत तीन गोष्टी येतातः- (१) प्रवर्तकप्रेरणांचें संयमन, (२) भावनांचे संयमन व (३) विचारांचे संयमन. प्रवर्तकप्रेरणांचे संयमन करावयाचे म्हणजे त्या समूळ नाहींशा करावयाच्या नाहीत. विचाराचे साहाय्याने त्यांचे स्वरूप पालटून त्यांना काहीतरी खऱ्या उपयुक्त कृतींचे हेतु बनवावयाचे. भावनांचें संयमन प्रवर्तकशक्तीचद्वारे करावयाचे. पूर्वी एकदां सांगितलेच आहे की भावना विशेष जोरदार झाल्या की तद्दर्शक काही शारीरिक व्यापार होतात.--(स्नायूंचें चलनवलन वगैरे क्रिया.) या क्रियांवर दाब ठेविला की भावनांवर दाब ठेवल्यासारखाच झाला.ज्या भावना चांगल्या व उपयुक्त असतील तेवढया मात्र राखावयाच्या. असो. प्रवर्तकशक्तीचे साहाय्याने बौद्धिक व्यापारांवरहि दाब ठेवितां येतो. लहान मुलांचे लक्ष