पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४७)

 प्रवर्तकशक्तीचे प्राथमिक शिक्षण:--
 (१) चलनेद्रियद्वारे प्रवर्तकशक्तीस शिक्षण मिळतें.
 (२) चलनेंद्रियें कह्यांत ठेवितां येऊ लागली की या शिक्षणास आरंभ होतो.
 (३) वाचन, लेखन, चित्रकला वगैरे विषयांत प्रवर्तकशक्तीस शिक्षण मिळतें.

भाग विसावा.
विचारपूर्वक कृति; शील.

 मागील भागांत बालपणीं ऐच्छिक चलनक्रिया कसकशा होत जातात, त्यांची कारणे काय वगैरेविषयी उल्लेख केला आहे. मनुष्याच्या कृति विचारपूर्वक होऊ लागल्या, त्यांत दूरदर्शित्व दिसूं लागले, म्हणजे प्रवर्तकशक्तीचे उच्च व्यापार होऊ लागले असें समजावें. बाळपणचे कृतींस कांहीतरी साधे कारण बस होते-- कृतिप्रेमामुळे अगर स्वसामर्थ्य दर्शविण्याचे इच्छेने किंवा काहीतरी शारीरिक इच्छा तृप्त करण्याचे इच्छेने मुले बाळपणी कृति करण्यास प्रवृत्त होतात अथवा कृति करितात. प्रवर्तकशक्तीचे उच्च विकासास बुद्धीचा विकास व भावनांचा विकास या दोहोंची फार मदत होते. भावनांचा विकास होऊ लागला की नवीन नवीन इच्छा उत्पन्न होतात. बुद्धीचा विकास झाल्याने अपरिचित कल्पनांचें ग्रहण करितां येऊ लागते. अर्थात् यामुळे इच्छेची मर्यादा वाढते. लहानपणी जर काम केलें, उद्योग केला, तर थोरपणी त्याचे फळ आपणास मिळेल ही कल्पना जेव्हा मुलाचे मनांत ठसेल, तेव्हांच मूल उद्योग करण्यास स्वखुशीने प्रवृत्त होईल.

 आरंभी आरंभी कृति संधानरहित असते; परंतु भावनांचा विकास जसजसा होत जातो, व विचारशक्ति जसजशी अधिकाधिक प्रबल होत जाते, तसतशी कृति सहेतुक व सकारण होत जाते.