पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४६)

एकदां शिक्षकाने दाखवावे. मुलांना स्वप्रयत्नाने जर हे शोधून काढितां आलें तर अधिक चांगले. लेखन, चित्रकला, वाचन, गायन, या विषयांचा हेतु मुलांचे अंगी आपले चलनेंद्रियांवर दाब ठेवण्याची शक्ति आणून देणे हा होय.

गोषवारा.

 इच्छेचे मागाहून व कृतीचे पूर्वी प्रवृत्ति हा व्यापार होतो.
 ऐच्छिक क्रियेची तीन अंगें:-(१) इच्छा, (२) योग्य कृतीची कल्पना (३) अवधान व ऐच्छिक चलन. ऐच्छिक क्रिया जसजशा वाढत जातात तसतसा प्रवर्तकशक्तीचा विकास होत जातो.
 अनुकरण:-- जिज्ञासा अनुकरण या क्रियेस कारणीभूत होते. अनुकरण ही क्रिया ऐच्छिक असते. अनुकरण क्रियेचा जोर तीन गोष्टींवर अवलंबून असतो:-(१) इंद्रियांतील तरतरी, (२) दुसऱ्यांच्या चलन क्रिया पाहून त्यांविषयी अभिरुचि उत्पन्न होणे व (३) चलाख स्वभाव.
 संवयः- मनुष्याच्या ऐच्छिक कृतींवर अम्मल चालविणारी संवय ही एक शक्ति होय. संवयीचा जोर तीन गोष्टींवरून कळतो:--(१) कांहीतरी उद्दीपक मिळतांच किती जलद त्यास प्रत्युत्तर मिळतें तें पहाणे, (२) संवयीवर दाब ठेवण्यास पडणारे प्रयास (३) संवयीची सफलता न झाल्यास त्यापासून होणारे दुःख. मनोविकास करण्याचे कामी संवयीची फार मदत होते.
 संवयीसंबंधी काही नियमः--
 (१) आरंभी आमिष पाहिजे व पुढे पुनरावृत्ति अवश्य पाहिजे .
 (२) 'कृतिप्रेम' ही भावना वाढवावी.
 (३) शिक्षकाने चांगले उदाहरण घालून द्यावें.
 (४) कोणत्याहि क्रियेचा आरंभ सुखद होईल अशी तजवीज करावी.
 (५) परिस्थितीकडे व मुलांच्या स्वभावाकडेहि लक्ष द्यावें.

 उद्योगीपणा, स्वच्छता, चांगली चालरीत, खरेपणा वगैरे संवयी शाळेत लावता येण्यासारख्या आहेत.