पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४५)

असते." असो. कधी कधी मुले मुद्दाम लबाडी करितात व खोटें बोलतात. अशा मुलांना कडक शासन केले पाहिजे. अपराध कबूल करण्यास नैतिक धैर्य पाहिजे, जो अपराध कबूल करितो त्याचे विषयी कोणालाहि दया उत्पन्न होते, त्याची नाचक्की होत नाही, इत्यादि गोष्टी, अशा मुलांना सांगाव्या, व यांविषयी खात्री होण्याकरितां इतिहासांतील व पुराणांतील निवडक निवडक दाखले द्यावे.
 प्रवर्तक-शक्तीचे प्राथमिक शिक्षणः- चलनेंद्रियद्वारे प्रवर्तकशक्तीस मिळणाऱ्या शिक्षणाचाच फक्त या ठिकाणी आपणांस विचार करावयाचा आहे. बौद्धिकशिक्षण देतांना चलनेद्रियांना शिक्षण मिळते; वाचन, लेखन, चित्रकला हे विषय बौद्धिकशिक्षणांतील प्रधान अंग होत; व याविषयांचे ज्ञान बरोबर होण्याकरितां जिव्हा, हस्त वगैरे चलनेंद्रियांना जरूर पडेल तशी गति देतां आली पाहिजे; त्यांना कह्यांत ठेवण्याची शक्ति आली पाहिजे. चलनवलन हे व्यापार प्रवृत्तिदर्शक असतात, हे या ठिकाणी पुन्हा एकवार सांगितले पाहिजे; हे व्यापार सहेतुक असतात. चलनेंद्रियावर दाब ठेवितां येऊ लागला म्हणजे प्रवर्तकशक्तीची वाढ होऊ लागली असे समजावे. हेतु व कारण प्रथम मुलांचे कृतीत दृष्टोत्पत्तीस येतात. ( कृति म्हणजे एक प्रकारची चलनक्रियाच होय.) निश्चय, धैर्य, दीर्घोद्योग वगैरे गुण मुलें कृति करू लागली की, त्यांचे अंगी येऊ लागतात. एकंदरीत कृति केल्याने प्रवर्तकशक्तीचा विकास होत जातो.
 प्रवर्तकशक्तीचे प्रथमविकासास मदत करितांना शिक्षकानें एक गोष्ट ध्यानात ठेवावी. ती ही की मुलांना स्वस्थ बसणे आवडत नाही. काहीतरी हालचाल करण्याकडे त्यांची विशेष प्रवृत्ति असते. ही त्यांची नैसर्गिक आवड तृप्त करावी. मुलांना काहीतरी उपयुक्त कृति करूं द्यावी. शिक्षकाने नुसती देखरेख करावी व अडेल तेथे सांगावें. समवयस्क सोबत्यांचीहि प्रवर्तकशक्तीचे विकासास बरीच मदत होत जाते. कोणतीहि कृति कशी करावी हे मात्र १३