पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४४)

कळकळ व वेळेचा सदुपयोग इत्यादि गोष्टींचा समावेश खरेपणा या शब्दांत होतो. भित्रेपणा, आपमतलबीपणा, हेवा, मत्सर, दुष्टबुद्धि, कल्पनाशक्तीचा कोतेपणा ही सर्व लबाडीची कारणे अगोदर समूळ नाहीशी करण्याचा शिक्षकाने यत्न करावा. शिक्षकाने स्वतांचे आचारांत व विचारांत नेहमी खरेपणा ठेवावा. नुसत्या उपदेशाने काम होत नाही. शाळेतील शिस्त फार कडक असू नये. ज्यायोगे मुलांना चीड येईल असे काहीहि करूं नये. खरेपणा आपणास आवडतो, लबाडी पाहिली की संताप, दुःख, आश्चर्य व अविश्वास उत्पन्न होतो, यांविषयी शिक्षकाने मुलांची खात्री करून द्यावी. मुलांची कल्पना शक्ति दाबांत ठेवावी व तिला चांगले वळण लावावें. कल्पनाशक्तीचे स्वैर पणानें केव्हां केव्हां मुले काहीतरी भलतेच सांगतात व ती खोटे सांगतात असें आपणांस वाटते. तेव्हां मूळचा खोटेपणा आहे की काय याची खात्री केल्याशिवाय शिक्षा देऊ नये. ज्या विषयांत निरीक्षणशक्ति व यथार्थवर्णनशक्ति वाढते असे वस्तुपाठासारखे विषयहि उपयोगी पडतात. बौद्धिक विकासहि करावाच. जी मुले मोठी असतील त्यांना चार उपदेशाच्या गोष्टी सांगाव्या, त्यांच्याशी वादविवाद करावा व त्यांची खात्री करून द्यावी. लबाडीपासून काय काय अनर्थ होतात ते सांगावें:- लबाड माणसांवर कोणीहि विश्वास ठेवीत नाहीत, सर्व माणसे त्यांचा तिरस्कार करतात, लबाडीने कलागती उत्पन्न होतात, विनाकारण निरुपद्रवी माणसांना त्रास होतो वगैरेविषयी त्यांची खात्री करावी; व खरेपणाविषयी आदरवुद्धि वाढविण्याचा यत्न करावा. लहान मुलांच्या स्वभावाचे नीट निरीक्षण करावें. लहान मुलांना खरेपणाचे महत्त्व समजत नसते. त्यांचे खोटेपणाबद्दल बहुधा त्यांचे कल्पनाशक्तीकडे दोष असतो. जीन पाल रिचरने म्हटले आहे, " पहिल्या पांच वर्षांत मुलें खरेंहि बोलत नाहीत व खोटेंहि बोलत नाहीत. नवे नवे शब्द ऐकले की त्यांचा भाषेत उपयोग करावयाचा व स्वतांची करमणूक करावयाची एवढे मात्र त्यांना ठाऊक