पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)


येतो. मनाचे चांगले ज्ञान होण्यास वर सांगितलेल्या दोन्ही मार्गाचा आपण उपयोग केला पाहिजे.
 मुलांच्या मनाचे ज्ञान आपणांस चांगले झाले म्हणजे त्यांच्या मनास योग्य वळण देणे सुलभ जातें; व हे वळण कसे द्यावें हेंच मानसशास्त्र शिकल्याने समजतें. (शिक्षण म्हणजे मुलांच्या मानसिक शक्तींचा योग्य तऱ्हेनें विकास करणे); याकरितां प्रत्येक शिक्षकानें, ज्यांना शिक्षण द्यावयाचे त्यांच्या मनाचे नीट अध्ययन केले पाहिजे. हे कसें करितां येईल हे वर सांगितलेच आहे.

मन व शरीर यांमधील परस्पर संबंध.

 एकाअर्थी शरीर हे मनाचा चाकर आहे असे म्हटल्यास हरकत नाही. मन काम सांगते व ते शरीर करिते. शरीर हे बाह्यजग व मन ह्यांमधील दळणवळणाचा एक मार्गच आहे. बाह्यजगाचे ज्ञान मनास होते. पण ते शरिराचेच द्वारे होते. तारायंत्राचे साहाय्याने ज्याप्रमाणे एके ठिकाणची बातमी दुसरे ठिकाणी नेता आणितां येते, त्याचप्रमाणे शरिराच्याद्वारे मनाचा बाह्यजगाशी व बाह्यजगाचा मनाशी संबंध जोडता येतो. वर सांगितलेल्या धनी व चाकर यांमधील नात्यापेक्षां मन व शरीर यांमध्ये अधिक निकट संबंध आहे असे म्हटल्यास चालेल. आशा, निराशा, आनंद, दुःख इत्यादिकांचा जेव्हां मनावर अंमल होतो तेव्हां आपले शरिरांतहि काही विवक्षित फेरबदल होतात; व या फेरबदलावरून एखाद्याच्या मनाची काय स्थिति आहे हे आपण अनुमानाने व स्वानुभवाच्या प्रमाणाने ठरवितो. जो मनुष्य नेहमी निरोगी असतो त्याचे मनहि निरोगी असते. परंतु जो नेहमों रोगी व अशक्त असतो त्याचे मनहि तसेंच असते. अशक्त माणसें चिडखोर, चंचल मनाची व अतिशय रागीट असतात, असे आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. यावरून आपणांस असें अनुमान काढितां येईल की, मनाची स्थिति शरिराच्या स्थितीवर अवलंबून असते. उलट आपणांस असेंहि आढळून येते की, ज्याच्या मनास चिंता, दुःख,