पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)


व त्याचे निरनिराळे अवयव व त्या अवयवांचे व्यापार, त्यांची अंतःस्थिति, त्यांचा एकमेकांशी संबंध वगैरेसंबंधी माहिती असणे अगदी अवश्य आहे, त्याचप्रमाणे शिक्षकास मन व त्याचे अवयव, त्या अवयवांचे व्यापार वगैरेबद्दल माहिती असणे अवश्य आहे, एवढे सांगितलें म्हणजे बस्स होईलसे वाटते. परंतु फक्त मानसशास्त्र चांगले अवगत असले म्हणजे एखादा माणूस उत्तम शिक्षक होईल असें मात्र कोणी समजू नये. शिक्षण ही एक कला आहे. कोणतीहि कला प्रत्यक्ष केल्याशिवाय येत नसते. जर कोणी म्हणेल की, मी क्रिकेट ( चेंडू फळी ) संबंधी पुष्कळ पुस्तकें वाचिली आहेत, तेव्हां मला उत्तम तऱ्हेनें क्रिकेट खेळतां येईल, तर आपण त्यास हसू. प्रवाही पदार्थ, त्यांचे गुणधर्म, त्यांचा दाब, यांविषयी कितीहि उत्तम माहिती एखाद्यास असली तरी त्यास जसे पोहता येणार नाही, तद्वतच नुसत्या मानसशास्त्राची कितीहि उत्तम माहिती असली तरी कोणीहि उत्तम शिक्षक होणार नाही. शिक्षकास लागणारी इतर सर्व सामुग्री जर त्यापाशी त्यास पुरे इतकी असेल, तर मात्र त्या सामुग्रीचा उपयोग योग्य तऱ्हेनें कसा करितां येईल हे मानसशास्त्र शिकवील. मनाचें ज्ञान आपणांस आपल्या मनाचे निरीक्षण करून तरी मिळविता येईल, अगर दुसऱ्याच्या मनाच्या निरीक्षणाने मिळविता येईल. पहिल्या तऱ्हेने मिळणाऱ्या ज्ञानास अंतर्ज्ञान व दुसऱ्यास बहिर्ज्ञान अशी आपण नांवें देऊ. आपल्या मनांत काय चालले आहे हे आपणांस प्रत्यक्ष ज्ञानाने समजते; परंतु दुसऱ्याच्या मनात काय आहे हे मात्र प्रत्यक्ष ज्ञानाने समजत नाही. हे समजण्यास त्याच्या बाह्यस्वरूपांत काय फेरबदल होतो याचे आपण नीट निरीक्षण केले पाहिजे; व आपल्या बाह्यस्वरूपांत असा फेरबदल झाला म्हणजे आपल्या मनाची कशी स्थिति असते त्याची आपणांस आठवण झाली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या मनांत काय चालले आहे हे आपणांस समजेल. परंतु अशा रीतीने जे ज्ञान होईल तें खास खरें असें मात्र म्हणता येणार नाही. मनामनांत सुद्धा पुष्कळ वेळा फरक दिसून