पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४३)

बोलणे इत्यादि चांगल्या सवयी मुलांस लावितां येतात. त्या कशा लावावयाच्या याविषयी थोडेसें सांगतों.
  उद्योगीपणाची संवय लावण्याच्या कामी उदाहरण व प्रत्यक्ष शिक्षण या दोहोंचाहि उपयोग करावा. काम व करमणूक यांची सांगड घालून द्यावी. मोठ्या मुलांना उपदेश करावा. आळसाचे कारण शोधून काढावे व तें समूळ नाहीसे करावें. मुलांचे स्वभावाकडेहि शक्य तेवढे लक्ष द्यावे.
 स्वच्छता व तत्संबंधी शिक्षकाचे कर्तव्यः-- शारीरिक व मानसिक आरोग्यास स्वच्छतेची किती जरूर आहे हे दाखवावें. प्रत्येक मुलाने आपला पोशाक, आपली पुस्तके, वह्या वगैरे जिनसा स्वच्छ ठेविल्याच पाहिजेत असा कडक नियम कोणतेहि कामांत टापटीप ठेवण्याविषयी खबरदारी घ्यावी. स्पेन्सरने असे म्हटले आहे की, ' घाणेरडेपणा व गुन्हा करण्याची प्रवृत्ति बहुधा एकत्र आढळतात.'
 चांगली चालरीत:-- मुलांस काय किंवा मुलींस काय लहानपणींच चांगली चालरीत लाविलीच पाहिजे, व याबद्दलची जबाबदारी शिक्षकांपेक्षां आईबापांवर जास्त असते. चांगली चालरीत या शब्दांत पुष्कळ गोष्टींचा समावेश होतो. भाषणांत मृदुलता, सभ्यवर्तन, दुसऱ्याचें मन न दुखाविणे, वडील माणसांविषयी आदर व तदनुरूप वर्तन, समाजनियमांचे उल्लंघन न करणे वगैरे गोष्टींचा समावेश या शब्दांत होतो. या वर सांगितलेल्या सर्व गुणांची वाढ करितांना शिक्षकाने एकदोन सामान्य नियम लक्षांत बाळगावेः- भावनांचा परिणाम कृतीत दिसला पाहिजे. चांगल्या भावनांचा विकास केला पाहिजे. विशेषेकरून सामाजिक भावनांचा विकास केला पाहिजे. सौंदर्यविषयक उच्च भावनांचाहि उपयोग करून घ्यावा. अगदी बारीकसारीक गोष्टीत सुद्धा सभ्यवर्तन ठेविले पाहिजे.
 खरेपणाः-- खरेपणा याचा अर्थ लबाडी न करणे, दुसऱ्यास न फसविणे असा आहे. कधी कधी हा शब्द बऱ्याच व्यापक अर्थी योजिलेला आढळतो. मनमोकळेपणा, प्रामाणिकपणा,