पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४२)

म्हणजे आपले आचरण शुद्ध राहते, स्मरणशक्तीत जोर येतो, व निर्णय, अनुमान वगैरे उच्च मनोव्यापार सुरळीत चालतात. चौकसपणाची संवय अनुमान करण्याच्या कामी फार मदत करते. मुलांना एकदां चौकसपणाची संवय लावून दिली की मग बौद्धिक-विकास सुलभ रीतीने होतो.
 कृति, संवय व शील यांमध्ये अगदी निकट संबंध आहे. कोणतीहि कृति वारंवार केल्याने संवय बनते; व संवयीपासून शील बनते. शील असे आपण ज्यास म्हणतों तें संवयींचे गाठोडेंच होय. असो. आतां आपण शाळेत मुलांना कोणकोणत्या संवयी लावितां येण्यासारख्या आहेत व या बाबतींत शिक्षकांनी काय काय केले पाहिजे याविषयी विचार करूं.
 मुलांस चांगल्या संवयी लावणे हे एक शिक्षणाचे महत्त्वाचे अंग आहे असें वर सांगितले आहे. याकामी शिक्षकांस उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या येणेप्रमाणे:-
 (१) कोणतीहि संवय लावावयाची म्हणजे आरंभी काहीतरी आमिष लागते, व पुढे वरचेवर पुनरावृत्ति करावी लागते. कृतीची काही तरी बाह्य गोष्टीशी सांगड घालून दिली पाहिजे. लहानपणींच कोणतीहि संवय लावणे शक्य असते वगैरे संवयीसंबंधाचे नियम शिक्षकाने नेहमी आपले नजरेसमोर ठेवावे, व या नियमांचे अनुरोधाने चांगल्या पद्धतीचा उपयोग करावा.
 (२) मुलांचे ठायी असलेल्या " कृतिप्रेम " भावनेचा योग्य उपयोग करावा.
 (३) शिक्षकाचे अनुकरण करण्याकडे मुलांची प्रवृत्ति असते; तेव्हां शिक्षकानेच चांगले उदाहरण घालून द्यावें.
 (४)कोणतीहि नवीन संवय आरंभी त्रासदायक वाटते; तेव्हां आरंभ सुखद होईल अशी तजवीज करावी.
 (५)परिस्थितीकडे व मुलांचे स्वभावाकडेहि लक्ष दिले पाहिजे; उदाहरणार्थ-आळशी मुलास उद्योगीपणाची संवय लागण्यास बराच काल लागतो. उद्योगीपणा, स्वच्छता, सभ्य चालीरीति, खरें