पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४०)

माहिना पंधरा दिवसांचे मूल या क्रिया करिते. तसेंच झोपेत आपण हातपाय हलवितों-हीहि संधानरहित क्रिया होय.
 प्रतिक्षिप्तः- लहान मुलाचे हातांत बोट दिले असतां मूल मूठ मिटते. तसेंच एखादा कडू पदार्थ तोंडांत घातला की तोंड वाईट करितें, किंवा दिवा जवळ नेला की डोळे मिटते, घशापाशी एखादा पदार्थ गेला की तो गिळते, या प्रकारच्या क्रिया प्रतिक्षिप्त समजाव्या.
 प्रकृतिसिद्धः- स्तनपान करणे. काही काही मुलें जन्मतांच हाताची बोटें चोखू लागतात. तसेंच रडणे, हसणे या क्रियाहि प्रकृतिसिद्धच होत. इतर प्राण्यांचे ठायींहि कांहीं प्रकृतिसिद्ध क्रिया आढळतात;- उदाहरणार्थ- पक्षी घरटी बांधितात, अंडी उबवितात.
 ऐच्छिक क्रियांचेहि तीन प्रकार आहेत; (अ) अनुकरण विषयक,(ब) इंद्रियसंबंधी व (क) सहेतुक. इंद्रियसंबंधी क्रिया म्हणजे ज्या क्रियांचा संबंध ज्ञानेंद्रियांशी येतो त्या क्रिया. ज्ञानेंद्रियांवर काहीतरी आघात होतो, व मग या क्रिया होतात. उदाहरणार्थ- मुलासमोर एखादा रंगीत पदार्थ धरिला की तो घेण्याकरितां मूल हालचाल करूं लागते.
 संवयः- संवय हा शब्द जर व्यापक अर्थाने योजिला तर त्याचा अर्थ विवक्षित परिस्थितीत विवक्षित प्रकारचा आचार विचार किंवा भावना होण्याची ठराविक प्रवृत्ति असा असतो. परंतु या शब्दाचा खरा अर्थ बराच संकुचित आहे. संवय ही मनुष्याचे ऐच्छिक कृतीवर अम्मल चालविणारी एक प्रकारची शक्ति आहे, असें म्हणण्यास हरकत नाही. संवयीचे प्रेरणेने आपले हातून ज्या कृति होतात त्या अनैच्छिक असतात; उदाहरणार्थ-- चालणे, पोशाक करणे वगैरे. चालतांना आपण नेहमी उजवें पाऊल प्रथम पुढे टाकितों; व एकदां चालू लागलों की त्या चालण्याचे क्रियेकडे लक्ष नसते. मात्र या क्रियेस आरंभ करण्याचे पूर्वी ऐच्छिक व्यापार होतो हे खरे. कोणतीहि क्रिया पुन्हा पुन्हा वरचेवर केल्याने सोपी वाटते. ती अंगवळणींच पडते असे आपण