पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३८)

सास आरंभ झाला असे समजावें. स्नायूंचे सहेतुक चलनास ऐच्छिक चलन म्हणतात; व हे अनुभवाशिवाय होत नसते. सुख अथवा दुःख यांपैकी कोणतेंहि झाले की स्नायूंचे चलनवलन होते. या चलनवलनक्रिया बऱ्याचशा झाल्या म्हणजे त्यांचा ठसा मनावर उमटतो, व सुखजनक कृति कोणती, दुःखजनक कोणती, हे समजतें. मुलांच्या प्रथमच्या हालचाली अनैच्छिक अशा असतात; व यांतून सुखजनक चलनाची निवड होते, व मग ते ऐच्छिक बनते. अभ्यासाविना कोणतेंहि ऐच्छिक चलन बरोबर करितां येत नाही.-( उदाहरणार्थ- लेखन, कवाईत वगैरे.). ऐच्छिक कृतींची संख्या ( यांत स्नायूंचे ऐच्छिक चलन येतेच ) जसजशी वाढत जाते, तसतसा प्रवर्तकशक्तीचा अधिकाधिक विकास होत चालला असें समजावें. मुलांचे कृतींचें जर आपण नीट निरीक्षण केले तर त्यांत अनुकरण ही कृति विशेष प्रबल अशी आढळते; तेव्हां याच कृतीचा आपण विचार करूं.
 अनुकरणः- अनुकरण हा शब्द व्यवहारांत बऱ्याच व्यापक अर्थाने योजिलेला आढळतो. परंतु हा शब्द चलनवलनकृतिदर्शक असाच खरोखर आहे; व शास्त्रीय ग्रंथांत अशाच अर्थी याचा उपयोग केलेला आढळतो. अनुकरण हे एक प्रकारचे ऐच्छिक चलन असते असे म्हणण्यास हरकत नाही. कारण पुष्कळ वेळां जिज्ञासा यास कारणीभूत होते. साधारणपणे पहिले वर्ष संपण्याचे सुमारास मुले फार अनुकरण ( वडील माणसांचे ) करूं लागतात. दुसरे व तिसरे वर्षी तर अनुकरणाचें मुलांस वेड लागते. अनुकरणक्रिया प्रकृतिसिद्ध नसते. मुले ती हळू हळू शिकतात. वडील माणसांच्या सर्वच क्रियांचे मुलें अनुकरण करितात असे नाही. काहीं विवक्षित क्रियांचेच अनुकरण करितात. कारण त्यांत एक प्रकारची त्यांना गम्मत वाटते. आणखी एक गोष्ट अशी की, सर्व परिचित माणसांचें मुले अनुकरण करितात असेंहि नाही.
 अगदी प्रथम अनुकरणक्रिया अनैच्छिक अशी असते व कालांतराने तिचे स्वरूप पालटून ती ऐच्छिक बनते. काहीतरी महत्त्वा-