पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३७)

निरनिराळे, परंतु ज्यांचा अगदी एकमेकांशी निकट संबंध आहे, असे व्यापार करणारी मन ही एक अद्भुत शक्ति परमेश्वराने प्रत्येक मनुष्यमात्राचे ठिकाणी घालून ठेविली आहे. या तीन व्यापारांपैकी बौद्धिक व्यापार व भावना यांचे विषयी येथवर सांगितले. आता राहिलेला व्यापार ज्यास आपण प्रवृत्ति हे नांव दिलेले आहे त्याकडे वळू.
 प्रवृत्ति व्यापाराचे स्वरूप ध्यानात येण्यासाठी एक उदाहरण घेऊं:-
 (१) आपणांस जेव्हां थंडी वाजते तेव्हां आपण विस्तवाजवळ जातो.' या उदाहरणांत चारपांच निरनिराळे व्यापार आहेत. प्रथम मनासमोर थंडी या शब्दाने वर्णन केलेली स्थिति हजर होते. नंतर या स्थितीचा आपले शरिराशी संबंध असलेला समजतो. नंतर विस्तवाकडे नजर जाते. विस्तवापासून उष्णता मिळते या गोष्टीची आठवण होते. नंतर थंडी व उष्णता यांतील भेद लक्षांत येतो, व उष्णता या शब्दाने वर्णन केलेल्या स्थितीचा अनुभव मिळावा अशी इच्छा मनांत उत्पन्न होते व लगेच आपण विस्तवापाशी जाण्याची कृति करितों. या उदाहरणावरून आपणांस असें समजते की इच्छा ही प्रवृत्तीचे अगोदर उत्पन्न होत असते. इच्छेचे मागाहून व कृतीचे पूर्वी प्रवृत्ति हा मनोव्यापार होतो. इच्छा हा व्यापारहि दिसतो तसा साधा नाही. यात काही बौद्धिक क्रियांचा अंश असतो व काही भावनांचाहि अंश असतो. वरील उदाहरणांत विस्तव दिसणे, थंडी वाजणे, उष्णता कशी असते याची आठवण होणे या सर्व बौद्धिक क्रिया होत. उष्णतेची कल्पना मनासमोर येतांच सुखजनक विकृति होणे हा भावनेचा अंश. यांशिवाय अवधान एकाग्र होणें हेहि व्हावे लागतेच. असो. आपण ऐच्छिक क्रियेचे पृथक्करण करून त्यांत कोणकोणते घटकावयव आहेत ते पाहूं. ऐच्छिक क्रियेत मुख्य तीन द्रव्ये सापडतात (१) इच्छा (२) योग्य कृतीची कल्पना ( ३) अवधान व ऐच्छिकचलन. ऐच्छिकचलनास आरंभ झाला म्हणजे प्रवर्तकशक्तीचे विका-