पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३५)

करिता कामा नये. मात्र ही अमलबजावणी शांतपणे व गंभीरपणे झाली पाहिजे. ज्या शिक्षकास अतिसंताप येतो व तो असह्य होतो, तो शिक्षक नैतिक शिक्षण देण्यास अयोग्य होय. दुष्कृति कोणी केलेली पाहिली की स्वताला दुःख होतें, सत्कृति पाहून बरें वाटतें असें शिक्षकाने मुलांचे नजरेस आणून दिले पाहिजे. असें केल्याने नैतिक नियमांविषयी मुलांचे मनांत आदर राहील. प्रामाणिकपणा, सत्यपणा वैगेरे सद्गुण मूर्तिमंत शिक्षकाचे ठिकाणी वास करीत असले पाहिजेत व मुलांची याबद्दल खात्री झाली पाहिजे. उच्च प्रकारचे नैतिक शिक्षणांत सहानुभूतियुक्त भावना ( आदर, प्रीति यांसारख्या ) व नैतिक निर्णय यांचे सतत कार्य व्हावे लागते. कोणती कृति नैतिकदृष्ट्या वाईट, कोणती चांगली याचा निर्णय संधि मिळतांच मुलांनाच करावयास लावावें. मुलांना त्यांचे स्वतांचे वागणुकीचे बरेवाईट परिणाम कसे काय होतात त्यांकडे लक्ष द्यावयास सांगावे. दुष्कृतीपासून काय फळ मिळतें, सुकृतीपासून काय मिळतें तें नीट दाखवावें. नैतिक शिक्षण देतांना आरंभी आरंभी कर्तव्यभंग व कर्तव्यासक्ति या दोहोंची अगदी सोपी परंतु ' मनावर ठसणारी अशी उदाहरणे सांगावी, नैतिक भावना जागृत ' करण्याकरितां व नैतिक निर्णयास स्फूर्ति देण्याकरितां इतिहास, कादंबऱ्या, नाटके, इसापनीतीतील गोष्टी वगैरेमधील निवडक निवडक भागांचा उपयोग करावा, तात्पर्य, सत्कृति व दुष्कृति यांची पुष्कळशी उदाहरणे मुलांचे मनासमोर असावी. मुलांचे नैतिक भावनांवर त्यांचे सोबती व खेळगडी यांचाहि बराच परिणाम होतो. पूर्वी सांगितलेच आहे की भावना या संसर्गजन्य असतात. नीति या शब्दाचा खरा अर्थ काय याचे ज्ञान मुलांस शाळेत चांगले होते. शाळेतील सर्व समाज नीतिनियमबद्ध असावा. शिस्त चांगली असावी; फार कडक असूं नये व फार सौम्यहि असू नये. नैतिक भावनांचा विकास करण्यासंबंधी चार गोष्टी वर सांगितल्या, त्या केवळ दिशादर्शक होत.