पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३४)

होईल. आपले कर्तव्य कोणते व काय हे मुलांस समजू लागले म्हणजे नैतिक भावनांना एक प्रकारची बळकटी येते. सदसद्विवेक आपण ज्यास म्हणतो त्यांचे तंत्राने मुलांचे सर्व आचरण होऊ लागले म्हणजे नैतिक भावनांचा पूर्ण विकास झाला असें समजावें. जेव्हां मुलांचे मनांत दुष्कृति करणाराविषयी पूर्ण तिटकारा उत्पन्न होतो इतकेच नव्हे तर दुष्कृतीचें नांव सुद्धा ऐकावयास नको, असे जेव्हा त्यांना वाटतें, व आपण केवळ नव्हे तर इतर सर्व जगांतील माणसें नैतिक नियमांनी बद्ध आहेत अशी जेव्हां त्यांच्या मनाची खात्री होते तेव्हां ही स्थिति आली असें समजावें.
 नैतिक उच्च भावनांचे शिक्षणः- घरांतील व शाळेतील शिस्त, आईबाप, सोबती व शिक्षक यांचे उदाहरण, वाचनांत येणाऱ्या कल्पित व ऐतिहासिक गोष्टी, या सर्वांचा नैतिक भावनांना योग्य वळण लावण्याचे कामी उपयोग होतो. बालपणचे शिक्षणांत नैतिक भावनांचे शिक्षणात अग्रस्थान दिले पाहिजे. नैतिक भावना मुलांचे ठायी मूळच्याच असतात. मात्र त्या बीजरूप स्थितीत असतात. त्यांची वाढ करणे हे काम आईबाप व शिक्षक यांकडेसच परमेश्वराने सोपविलेले आहे. आईबापांच्या शिक्षणाचे प्रथम या भावनांवर कार्य होते. खरोखर नैतिक शिक्षणाचे काम घरीच बहुतेक सर्व झाले पाहिजे, शाळेत थोडें होईल, नाही असे नाही. गृहशिक्षणांतील उणीव मात्र शाळेंत भरून काढता येईल. गृहशिक्षण व शाळेतील शिक्षण यांचे कार्य परस्परांस अनुकूल असेंच पाहिजे; परंतु याचे उलट प्रकारच बहुतेक आढळतो. असो. यासंबंधी येथे वादविवाद कर्तव्य नाही. शिक्षकांनी व आईबापांनी नैतिक शिक्षणाचे कामी काय काय केले पाहिजे तेवढे मात्र सांगावयाचे आहे. आपण घालून दिलेल्या नियमांचे हितकारक कार्य व्हावें अशी जर आपली इच्छा असेल तर नियम घालून देण्यापूर्वी पूर्ण विचार झाला पाहिजे. एकदां नियम ठरले गेले म्हणजे त्यांची अमलबजावणी सरसकट यथायोग्य झालीच पाहिजे. त्यांत कुचरपणा