पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३०)

वागणूक. एखाद्या मनुष्याचे वर्तन व त्या वर्तनाचा हेतु आपणांस समजताच आपले मनांत ज्या एक प्रकारच्या भावना उत्पन्न होत असतात त्यांसच नैतिक-उच्च-भावना म्हणतात. मनुष्याच्या वर्तनाचे नैतिकदृष्ट्या मन निरीक्षण करिते, त्यासंबंधी थोडाबहुत विचारहि होतो, व नंतर या भावना उत्पन्न होतात. नैतिक भावना सुखजनक असतात व दुःखजनकहि असतात. एखाद्याने आपले कर्तव्य योग्य तऱ्हेनें केलेलें पाहिलें म्हणजे आपले मनांत ज्या भावना उद्भवतात त्या सुखजनक असतात. उलट एखाद्या माणसाची कर्तव्य-पराड्मुखकृति पाहून दुःखोत्पादक नैतिकभावना उत्पन्न होतात. दुसऱ्याने केलेली सत्कृत्ये पाहून आपले मनाची प्रवृत्ति त्याचे अनुकरण करावे अशी झाली पाहिजे. नुसत्या नैतिक भावनांचा मनांत उद्भव होण्यापासून काहीएक उपयोग नाही. नैतिक भावनांत जें मुख्य घटक द्रव्य आढळतें तें इतर भावनांत नसते; हे घटक द्रव्य कर्तव्यज्ञान होय. दुसऱ्याचे चांगले वर्तन पाहून आपण पसंती दर्शवितों व त्या वर्तनांत जर काही विशेष चांगलेपणा आढळला तर आपण प्रशंसा करितों या गोष्टीस नैतिक निर्णय म्हणतात; व हा निर्णय नैतिक नियमांचे आधारे आपण ठरवितो. हे नैतिक नियम कोणते, काय, कोणत्या पुस्तकात आहेत, असे जर कोणी विचारील तर त्यास एवढेच उत्तर देतां येईल की, हे नियम म्हणजे साधारणपणे चार सुज्ञ व समंजस माणसांस आवडणारा वर्तनक्रम होय.
 नैतिक नियम व सरकारी कायद्यांतील नियम यांची आपण तुलना करूं म्हणजे त्यांचे स्वरूप लक्षात येईल. नैतिक नियम आपण होऊन आपल्यावर लादून घेतो. सरकारी कायद्यातील नियम आपणांवर लादिले जातात. नैतिक नियमांची मर्यादा बरीच विस्तृत असते त्यांचा उद्देशहि उच्च प्रकारचा असतो. कायद्यांतील नियमांची अशीच केवळ स्थिति असते असे म्हणता येत नाही. नैतिक नियमान्वयें निर्णय देतांना आपणांस हेतु व कारणे यांचा विचार प्रथम करावा लागतो व नंतर कृतीचा विचार. सरकारी कायद्यान्वये प्रथम कृतीविषयी विचार व नंतर हेतूविषयी. खोटे बोलणे वाईट, परंतु काही