पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३२)

तरी सत्कृति करण्याचे उद्देशाने जर एखादा माणूस खोटें बोलला तर नैतिक नियमान्वयें तो दोषी समजला जात नाही. नैतिक नियमांत काय झाले पाहिजे अगर होणे इष्ट आहे, कशी स्थिति ( वर्तनासंबंधी ) असावी येवढेच सांगितलेले असते. नैतिक नियम सर्वाशी दोषरहित व परिपूर्ण असेच असतात; अर्थात् ते केव्हांहि कोणाहि माणसास ग्राह्य असलेच पाहिजेत.
 मागील भागांत सांगितलेच आहे की सौंदर्याविषयी निरनिराळ्या लोकांत निरनिराळ्या कल्पना असतात. नीतिविषयी हीच स्थिति आढळते; नैतिकदृष्टया कोणती गोष्ट बरोबर, कोणती चुकीची यासंबंधी बराच मतभेद निरनिराळ्या राष्ट्रांत आढळतो. फार दिवस चालत आलेली रूढि व कायद्यातील व नैतिक शास्त्रांतील कानू यांमध्ये बहुधा विरोध असतो. अगदी प्राचीन काळी रूढि व नीति यांत भेद नसे. रूढीस जी गोष्ट संमत तीच नैतिक समजत असत. जसजशी सुधारणा होत चालली तसतशी या दोहोंत फाटाफूट होऊ लागली. नैतिक तत्त्वांसंबंधी जरी मतभेद असला तरी सर्व सुधारलेल्या राष्ट्रांतील लोकांना मान्य अशी काहीना काहीतरी तत्वें म्हणून आहेतच; या तत्वांचे अनुरोधाने नेहमी आपण वागण्याचा यत्न केला पाहिजे, तरच आपले अंगी नैतिक गुण येत जातील. असो. आतां आपण नैतिक भावनांची वाढ कसकशी होत जाते ते पाहूं
 नैतिक-भावनांची वाढः-- नैतिक-भावना काही अंशी प्रकृति सिद्ध असतात,व काही अंशी शिक्षण व अनुभवनिर्मित असतात. मुलांचे अंगी असलेल्या कांहीं नैसर्गिक गुणांमुळे नैतिक भावनांचा विकास होत जातो. वडील माणसांचा मुलांना धाक वाटतो. आईने डोळे वटारले, किंवा आई रागें भरली की मूल रडत असले तरी तोंड मिटते, अगर एखादें खोडसाळ कृत्य करीत असले तर ते एकदम बंद करितें. आरंभी आरंभी मुलांना वडील माणसांचा ताबा असह्य व जाचक असा वाटतो, व विनाकारण शिक्षक व आईबाप आपणांस छळतात असे त्यांना वाटते. मुलें