पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२९)

 सौंदर्यविषयक भावनांचे शिक्षण:-- शिक्षकाने व आईबापांनी सौंदर्यविषयक भावनांचा विकास हा केलाच पाहिजे. कारण हा विकास केल्याने इतर दुष्ट भावना निर्मूल होतात व शिवाय मुलांचे सुखाचे साधनांतहि भरती पडते, आणि त्यामुळे त्याची थोडीशी मर्यादा वाढते. लहानपणापासून सुबक, मनोहर, चित्रविचित्र अशाच जिनसा घरी मुलांसमोर आणाव्या. एक गोष्ट नेहमी शिक्षकानें लक्षात ठेवावी ती ही लहानपणी मनावर जो ठसा उमटतो तो चिरस्थायी असतो ! मुलांना सृष्टीतील निरनिराळ्या रमणीय व सुंदर वस्तुहि दाखवाव्या; व त्यांचे त्यांकडून नीट निरीक्षण करवावें:- चित्रविचित्र फुले, फळे, पक्षी, किडे, पाने वगैरे वस्तूंत सौंदर्य परमेश्वराने कसे ओतप्रोत भरले आहे ते दाखवावे. तसबिरा, कोरीव काम, पुतळे, देवादिकांच्या मूर्ति, यांसारख्या वस्तूंतील सौंदर्य जाणण्यास मुलांस शिकवावें. लहानपणी मुलांचे हातांत चित्रे असलेली पुस्तकें द्यावीत; व चित्रे कशी पहावी हे समजावून सांगावें. घरी व शाळेत, गायन, वाङ्मय इत्यादि विषयांत अभिरुचि उत्पन्न करण्याचा एकसारखा यत्न करावा. मुलांचे ठिकाणी असलेली जी कृतिप्रेम भावना तिचीहि मदत घ्यावी. मुलास एखादें चित्र दाखवावें व तसेंच दुसरें काढावयास लावावें. असे केल्याने खरी खुबी कोठे आहे ते त्याला समजेल. तात्पर्य घरी, दारी शाळेंत, रस्त्यांत, नाटकगृहांत, बाजारांत, सर्व ठिकाणी सौंदर्याभिरुचि वाढेल अशी तजवीज करावी. असो. सौंदर्यविषयक भावनांचे शिक्षणाचा, बौद्धिक शिक्षणाशी व नैतिक शिक्षणाशी बराच संबंध आहे, हे या ठिकाणी सांगितले पाहिजे. वाचन, लेखन, चित्रकला, निबंधलेखन, कविता सुरावर म्हणणे इत्यादि पुष्कळ बौद्धिक शिक्षणांतील विषयांत सौंदर्यविषयक भावनांचा विकास होतो. वाड्मय व प्राचीन कवींची काव्ये कल्पनासौंदर्याने व विचारसौंदर्याने कशी भरून गेलेली आहेत ! यांचा आपले कामी उपयोग मात्र करणारे शिक्षक पाहिजेत. असो. सौंदर्यविषयक भावनांस शिक्षण दिल्याने नैतिक शिक्षणासहि थोडीशी मदत होते. ज्या मुलास