पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२८)

हा व्यक्तिनिर्णय झाला; व याचाच उद्भव अगोदर होतो व पुढे हळू हळू मूल एखादा पदार्थ पाहून व तो आपणास व इतरांसहि सुंदर वाटतो, म्हणून तो सुंदर असें म्हणू लागते. हाच खरा सौंदर्यविषयक निर्णय होय. एखादे माणसास एखादा विवाक्षित पदार्थ सुंदर वाटतो; दुसऱ्यास तो वाटत नाही. यावरून व्यक्तिव्यक्तीच्या सौंदर्यविषयक आवडींत फरक असतो हे उघड दिसते. अशीच स्थिति राष्ट्रांची असते. एका राष्ट्रांतील लोकांस जी गोष्ट सुंदर वाटते ती दुसऱ्या राष्ट्रातील माणसांस वाटत नाही. चीन देशांत पुरुषांनासुद्धा वेणी घालण्यांत एक प्रकारचे भूषण वाटते; म्हणून ते वेणी घालितात व पाठीवर ती लोंबत ठेवितात. ही गोष्ट आपणांस चमत्कारिक वाटते व चिनी लोकांस सौंदर्यज्ञान नाहीच असे वाटते. अशी जरी स्थिति आहे तरी सर्व राष्ट्रातील माणसांना मान्य अशी कांहीतरी सौंदर्यविषयक तत्त्वे असतात, व यांचेच आधारे आपले सौंदर्यविषयक निर्णय ठरविले पाहिजेत.

 सौंदर्यविषयक भावनांची वाढः- - बौद्धिक विकास व भावनांचा विकास बराचसा झाल्याविना खरे सौंदर्यज्ञान होत नसते. लहान मुलांची बुद्धि फार कोती असते, आणि त्यांच्या भावना जरी थोड्याबहुत विकास पावलेल्या असतात तरी त्या अस्थिर असतात. यामुळे त्यांना खऱ्या सौंदर्याची कल्पनाच नसते. एखादा पदार्थ मनोहर वाटला की मुलें तो सुंदर आहे असें म्हणतात. ही स्थिति हळू हळू नाहीशी होते. चकाकणारे पदार्थ व मंजूळ आवाज यांपासून प्रथम मुलांचे मनास आल्हाद होतो. मूल जरी एक महिन्याचे असले तरी त्याचे समोर रंगीत गोट्या अगर दुसरा एखादा चकचकणारा पदार्थ आपण धरिला असता त्यास आनंद होतो असे त्याचे हालचालीवरून दिसते. लहान मुलांचे लक्ष पदार्थातील विशेष आकर्षक भागांकडे आकर्षिले जाते व त्यांतील सामान्य सौंदर्य अगर रमणीयता काय आहे हे समजण्याची शक्ति मुलांचे अंगी नसते. कालपरत्वे ती येते.