पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२७)

एक प्रकारचे वळण हे होय. कवीस हे वळण निसर्गदत्त असते; वनस्पतिशास्त्रज्ञास शिक्षणाने हे मिळालेले असते. सौंदर्यविषयक भावना प्रथम उत्पन्न होतात तेव्हां ज्ञानेंद्रियास सुखजनक विकृति झाल्यामुळे होतात; परंतु त्या टिकण्यास व त्यांची वृद्धि होण्यास कल्पनाशक्तीची मदत लागते. कल्पनाशक्ति जर चांगली प्रबल असेल तर या भावनाहि प्रबल होतात व बराच काल पावेतो टिकतात. असो. सौंदर्यविषयक उच्च भावना बऱ्याच गहन असतात. यांचे जर पृथक्करण केले तर त्यांत मुख्य दोन घटकावयव सांपडतात, ते येणेप्रमाणे:-
 (१) इंद्रियदत्त द्रव्यः- यांत सुखजनक संवेदने यांचा समावेश होतो. ज्ञानेंद्रियास योग्य व पुरी इतकी चेतना मिळाल्यास सुखकारक संवेदनें उत्पन्न होतात. उदाहरणार्थ--गायनांतील शुद्ध सूर जेव्हां आपण ऐकतों अगर जेव्हां आपण चित्रविचित्र व मनोवेधक रंग पहातो तेव्हा आपले श्रोत्रेंद्रीयास व नेत्रांस समाधान होतें; कारण या इंद्रियांतील सूक्ष्म ज्ञानतंतूंना जी चेतना मिळते ती पथ्यकारक अशीच असते. सौंदर्यबोध होण्यास थोडाबहुत अनुभवहि पाहिजे हेंहि येथे सांगितले पाहिजे.
 बौद्धिक द्रव्य- इंद्रियद्रव्याचे नीट निरीक्षण व परीक्षण अगोदर व्हावे लागते; व नंतर त्यांतील संबंध कशा प्रकारचा आहे, काय आहे, या गोष्टींचे ज्ञान व्हावे लागते. हे ज्ञान बोधशक्तिद्वारे होते. अर्थात् बोधशक्तीचा व्यापार व्हावाच लागतो.

 सौंदर्यविषयक उच्च भावना नेहमी सुखजनक असतात; व हे सुखहि उच प्रकारचे असते. तसेच या भावना शुद्ध असतात व वाटेल त्यांस यांचा अनुभव घेण्यास सांपडतो. असो. एखादी वस्तु सुंदर आहे किंवा बेढब आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हां सौंदर्यविषयक निर्णय हा व्यापार होतो. सौंदर्यविषयक ज्ञान होत जाते तेंहि काहीएका क्रमाने होत जाते. मूल अमुक एकच रंग चांगला असे म्हणते याचे कारण तो रंग त्यास चांगला वाटतो हेच. (या निर्णयास सौंदर्यविषयक निर्णय हे नाव देता येत नाही.)