पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२४)

कल्पनांची मुलांस ओळख करून द्यावयाची असेल त्या गोष्टींची अगर कल्पनांची शिक्षकाला स्वताला प्रथम अभिरुचि असली पाहिजे, व ती आहे असे त्याने स्वकृतींनी दाखविले पाहिजे. तसेच त्यांची निवडानिवङ व मांडणीहि बरोबर केली पाहिजे. ज्ञानार्जन केवळ ज्ञानार्जनाकरितां करावयाचें, अन्य हेतूने नव्हे, हे तत्त्व मुलांचे मनांत पक्कें बिंबले पाहिजे. ' बुद्धिर्यस्य बलं तस्य ' हे तत्त्व व्यवहारात किती महत्त्वाचे आहे हे मुलांना नीट समजावून सांगावे. मुलांचे अंगी असलेली नैसर्गिक जिज्ञासा जितकी वाढवितां येईल तितकी वाढवावी; व मुलांनी काही प्रश्न केले की न संतापतां शांतपणे त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करावें. हल्ली सरकारी शाळांतून वस्तुपाठ हा विषय शिकवितात. जिज्ञासा वाढविण्याचे कामी खरोखर हा विषय अत्यंत उपयोगी आहे. मात्र याचा योग्य उपयोग करून घेणारे शिक्षक पाहिजेत. मुलांचे जिज्ञासेस योग्य वळण लावण्याचे कामी शिक्षकाकडून कांही चुका होण्याचा नेहमी संभव असतो:- फार श्रम झाल्यास मुलांचे जिज्ञासेस थकवा येतो, तेव्हां उगीच बारीकसारीक गोष्टी सांगू नयेत; तसेंच योग्य रीतीने जिज्ञासा जागृत करण्याविषयी खबरदारी घ्यावी. वस्तुपाठ शिकवितांना प्रत्यक्ष वस्तूंनी जशी जिज्ञासा जागृत होते तशी तसबिरा वगैरे अन्य साधनांनी होत नाही; परंतु काही काही शिक्षक वस्तुपाठ शिकवितांना या अन्य साधनाचाच फार उपयोग करितात. कोणताहि विषय शिकवितांना तो चित्ताकर्षक होईल अशाच गोष्टी शिक्षकाने कराव्या. जे निरनिराळे मुद्दे मुलांपुढे आणावयाचे असतील, त्यांपैकी अगोदर कोणता आणावयाचा या नीट मनन करून टाचण करून ठेवावे. 'अगोदर विशेष गोष्टी व नंतर सामान्य सिद्धांत' हा क्रम नेहमी ठेवावा. कोणत्या मुलांस कोणते विषय आवडतात ते पाहावे व ती आवड वाढविण्याचा शक्य तितका यत्न करावा.