पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२१)

नांची उत्पत्ति होते. हे दुःख कोणते म्हणाल तर अज्ञानापासून होणारे. तसेंच प्रयत्नांत येणारे अपयश, त्यापासून होणारी निराशा व मानसिक थकवा अगर शारीरिक थकवा यांमुळेहि दुःखच उत्पन्न होते. आता या भावनांत काही सुखाचाहि अंश आहे. आपले ठायीं असणारे अज्ञान घालवावें या इच्छेचे प्रेरणेमुळे आपण कृति करूं लागतो. त्यामुळे इंद्रियांना चलन मिळते व तेणेकरून मनास बरे वाटते. तसेच आपल्या कामी आपणांस जर यश येऊ लागले तर त्यांत गोडी लागू लागते, व यामुळे सुख होते. भिन्न भिन्न प्रकारच्या बौद्धिक व्यापारांपासून भिन्न भिन्न प्रकारच्या भावना उत्पन्न होतात. उदाहरणार्थ पदार्थातील भेदभाव समजल्याने एक प्रकारचे समाधान होते. तसेच अगदी भिन्न दिसणाऱ्या पदार्थात अगर कल्पनांत साम्य आढळून आल्यासहि काही एका तऱ्हेचे समाधान होते. त्याचप्रमाणे स्वप्रयत्नापासून जी ज्ञानप्राप्ति होते तीमुळे होणारे सुख अगर समाधान काहीएक विशिष्ट प्रकारचे असते. असो. आतां आपण बौद्धिकभावनांची वाढ कसकशी होत जाते ते पाहूं.
 बौद्धिकभावनांची वाढ; मुलांची जिज्ञासा:- नवीन नवीन कल्पनांची व वस्तूंची आपणांस ओळख व्हावी व आधिक अधिक माहिती होत जावी असें मुलांना वाटत असावे, असे त्यांचे वर्तनावरून दिसते. यावरून ज्ञानार्जनप्रीतीचा अंकुर त्यांचे ठायीं असतो ही गोष्ट सिद्ध होते. मात्र अनुभवाचे अभावामुळे व कल्पनांचे कोतेपणामुळे ज्ञानार्जनसुखाचे त्यांना सेवन करितां येत नाही. नव्या नव्या अपरिचित गोष्टींविषयी मुलांना प्रथम नुसतें कुतूहलच वाटते. जसजसा कल्पनांचा जमाव अधिक अधिक होत जातो व भाषा बोलतां येऊ लागते, तसतसे हे कुतूहल जाऊन त्याचे ठिकाणी जिज्ञासा येते. मुलांचे इतर भावनांप्रमाणे ही जिज्ञासा क्षणिक व जोरदार असते, व हिची उत्पत्ति बहुधा मुलांचे नैसर्गिक चलनापासून होत असावी असे वाटते. अभिरुचि उत्पन्न झाल्याशिवाय जिज्ञासा टिकत नाही, व ही जर