पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२०)

ही भावना उत्पन्न करितांना व तिचा विकास करितांना प्रत्यक्ष उदाहरणांचा शक्य तेथें उपयोग करावा. एखाद्याचे कष्टमय स्थितीच वर्णन केल्याने सहानुभूति उत्पन्न करितां येईल, नाही असें नाही; तरी पण तिचा जोर बेताबाताचाच असणार. तसेंच ही भावना नुसती जागृत करून स्वस्थ बसू नये. मुलांचे कृतींत ती उतरेल अशी तजवीज करावी. दुःखपीडित माणूस पहातांच मुलांना कळवळा वाटला पाहिजे व त्याचे दुःखशमनार्थ त्यांचे हातून काहीतरी कार्य झाले पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांचा उत्कर्ष झालेला पाहून मुलांना आनंद वाटला पाहिजे, याविषयी शिक्षकानें यत्न करावा. हे काम जरा कठीण आहे असें वर सांगितले आहे, तरी पण हे काही अशक्य नाही. कारण आपले शाळेतील खेळगड्यांचा क्रिकेटचे अगर फुटबॉलचे सामन्यांत विजय झालेला पाहून कितीतरी मुलांना आनंद होतो बरें ! शिक्षकाने मुलामुलांत प्रेमभाव उत्पन्न करावा व त्यांचे कल्पनाशक्तीचा विकास करून तिचे साहाय्य मिळवावें. वाङ्मय, इतिहास, रामायण, महाभारतांतील गोष्टी, वगैरेचाहि सहानुभूति वाढविण्याचे कामी उपयोग होण्यासारखा आहे; मात्र शिक्षक चांगला पाहिजे.

गोषवारा.

 सामाजिक भावनांचा संबंध दुसऱ्यांशी येतो.
 प्रीतिः--- प्रकृतिसिद्ध असून थोडीशी अहंपरहि आहे.
 सहानुभूति:-- या शब्दाचा अर्थ दुसऱ्याच्या सुखाचा अगर दुःखाचा वाटेकरी होणे; सदिच्छा, भूतदया, प्रेम या अर्थीहि हा शब्द वापरतात. ज्ञानेंद्रियांची विवक्षित स्थिति, चांगली कल्पनाशक्ति व बौद्धिक विकास यांवर सहानुभूति अवलंबून असते. वाईट शरीरप्रकृति, म्हातारपण, राग, द्वेष मत्सर या गोष्टी सहानुभूतिविघातक होत.

 सहानुभूतीची वाढ:-अनुकरण क्रिया सुरू झाल्या की मुलांच्या ठिकाणी सहानुभूतीचा उद्भव झाला असे समजावें. बौद्धिक विकास जसजसा होत जातो तसतशी सहानुभूति विकास पावते.