पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११९)

अगोदर शिक्षकाने मिळवावी. शिक्षकाने मुलांना प्रेमाने वागवावें. शाळेंत, शाळेबाहेर व मुले खेळ खेळत असतां त्यांच्याशी मिसळावे, व त्यांच्या अडचणी दूर कराव्या. असे केले म्हणजे शिक्षकाविषयी मुलांना प्रेम व आदर वाढू लागेल. अर्थात् शिक्षकाची मर्जी संपादण्याचा ती मनापासून यत्न करूं लागतील, व शिक्षकास जसे वर्तन रुचेल तसेंच ती आपले वर्तन ठेवू लागतील. शिक्षक व मुलें यांमध्ये ज्याप्रमाणे सहानुभूति असणे अवश्य आहे त्याप्रमाणे मुलामुलांतहि सहानुभूति पाहिजे. ही सहानुभूति जर असेल तर बौद्धिक शिक्षणाचे कामी शिक्षकास मुलांचे चांगले साहाय्य मिळेल.तरतरीत ज्ञानार्जनोत्सुक, उद्योगी व आज्ञाधारक असे आपले वर्गातील सोबती पाहून साहजिकच कोणत्याहि मुलाचे मनांत आपण आपले सोबत्याचे अनुकरण करावे अशी इच्छा होते. व ही इच्छा अधिक प्रबल सहानुभूतीमुळे होते. मुलामुलांत सहानुभूति असेल तर मुलें एकमेकांना मदत करण्यास तत्पर असतात. जी मुले उद्योगी व कुशाग्र बुद्धीची असतात त्यांना आपल्या वर्गातील आळशी व मंदमति मुले पाहून वाईट वाटते, व ती अशांना मदत करितात. असो. सहानुभूतीचा विकास करितांना शिक्षकाने एक दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. पहिली गोष्ट मुलांची नैसर्गिक स्थिति; मुलांचे ठायीं अहंपर भावना मात्र प्रकृतिसिद्ध असतात. सहानुभूतीचा लेशहि नसतो. तेव्हां प्रथम जर कोणांविषयी मुलांना सहानुभूति वाटण्याचा संभव असेल तर तो सभोवार नेहमी असणाऱ्या माणसांविषयींच होय. दुसरी गोष्ट अशी की, सहानुभूति व कष्टमय स्थिति एके ठिकाणी फारशी आढळत नाहीत.-- दुसऱ्याचे दुःख पाहून आपणांस वाईट केव्हां वाटेल ! अर्थात् जेव्हां आपण दुःखापासून विमुक्त असूं तेव्हां. मुलांचे मनांत जर एखाद्या दुःखित माणसाविषयी सहानुभूति उत्पन्न करावयाची असेल तर अगोदर ती स्वतां दुःखविमुक्त राहतील याबद्दल झटावे. शाळेतील शिस्त अशी असावी की, तीमुळे विनाकारण कोणास त्रास अगर दुःख होता कामा नये. सहानुभूति