पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११८)

सहानुभूति विकास पावते. प्रथम प्रथम बाल्यावस्थेत आपणांस आपली घरची प्रीतींतील माणसें व जनावरें (- मांजर, कुत्रा, वांसरु ) वगैरेविषयींच सहानुभूति वाटत असते. परंतु ही सहानुभूतीची मर्यादा शिक्षणाने वाढत जाते. आपण शाळेत जाऊं लागलों की शाळेतील मुलांबद्दल आपले मनांत एकप्रकारचे बंधुप्रेम वाटू लागते व सहानुभूति वाटते. जसजसे आपण मोठे होत जातों व आपणांस शिक्षण मिळत जाते, तसतसे आपले मनांतील कोते विचार व कल्पना कमी कमी होत जातात. आपले देशबांधव हे आपणांसारखेच आहेत, त्यांना दुःख झाले तर ते आपणांसच होते, त्यांचा उत्कर्ष व अपकर्ष म्हणजे आपला उत्कर्ष-अपकर्ष वगैरे उच्च गोष्टींची ओळख शिक्षणाने आपणांस होते, व मग अर्थात् आपले देशबांधवांविषयीं साहानुभूति आपणांस वाढू लागते व तदनुरूप आपण कृतिहि करूं लागतो. जेव्हा सर्व जगांतील माणसे आपले बंधुवर्गातीलच होत, कारण एकाच परमेश्वराने त्यांना निर्माण केलेले आहे, ही कल्पना आपले मनांत ठसते व आपणांस त्यांचेविषयी सहानुभूति वाटते व त्याप्रमाणे आपलेकडून कृति होऊ लागते, तेव्हां मात्र सहानुभूति या भावनेचा पूर्ण विकास झाला असे समजावे. परंतु अशी स्थिति क्वचितच होते. ज्या राष्ट्रांत ही स्थिति दिसून येते तेंच राष्ट्र खरे सुधारलेले समजावें. हिंदुस्तानांतील लोकांवर प्लेग, दुष्काळ यांसारख्या दैविक आपत्तींचा घाला पडलेला पाहून इंग्लंड, अमेरिका, जपान येथील लोकांना साहानुभूति वाटावी व द्रव्यद्वारें अगर अन्य तऱ्हेने मदत करण्यास त्यांनी तयार व्हावे ही गोष्ट खऱ्या सुधारणेची व शिक्षणाची साक्ष देते असे कोणीहि कबूल करील.
 सहानुभूतीचे शिक्षणः--बौद्धिक व नैतिक विकास करण्याचे कामी सहानुभूतीची मदत लागते. विद्यार्थी व शिक्षक यांचेमध्ये जर परस्परांविषयी सहानुभूति व प्रेम नसेल तर शिक्षणाचे काम बरोबर होणार नाही. याकरितां मुलांची सहानुभूति