पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११६)

 सहानुभूतिः– सर्व भावनांतील सहानुभूति हे महत्त्वाचे घटक द्रव्य होय. अथवा सहानुभूति या शब्दाचा खरा अर्थ दुसऱ्याचे सुखाचा अगर दुःखाचा वाटेकरी होणे असा आहे. शिक्षकाची मुलांबद्दल सहानुभूति असली पाहिजे, व मुलांचीहि शिक्षकाविषयी सहानुभूति पाहिजे असें पूर्वी एकदोन वेळां सांगितले आहे. याचा अर्थ काय हे येथे सांगितले पाहिजे. याचा अर्थ असा की मुलांना काही दु:ख झाले अगर सुख झाले की त्याचा परिणाम तात्काल शिक्षकाचे मनावर झाला पाहिजे, व स्वताला जर तशी स्थिति प्राप्त झाली असती तर जे काही करण्यास शिक्षक प्रवृत्त झाला असता तेच करण्यास तो प्रवृत्त झाला पाहिजे. सहानुभूति हा शब्द थोड्याशा व्यापक अर्थानेहि योजिलेला आढळतो; सदिच्छा भूतदया, प्रेम या अर्थाने पुष्कळ वेळां हा शब्द वापरतात. दुसऱ्याविषयी सहानुभूति वाटणे व तदनुरूप आपण वागणे या दोन गोष्टी एकामागून एक झाल्या पाहिजेत तरच सहानुभूति वाटण्याचा उपयोग. सहानुभूति दाखविण्यांत स्वतांला काहीतरी दुःख सोसावे लागते. परंतु ज्या माणसाविषयी आपण सहानुभूति दाखवितों, त्यास मात्र काहीतरी सुख होते. दुसऱ्यास दुःख झालें म्हणजे आपणांस वाईट वाटते, आपले मनांत सहानुभूति उत्पन्न होते व आपले हातून शक्य तेवढी मदत करण्यास आपण पुष्कळ वेळां तयार होतो, असा अनुभव पुष्कळांना आला असेल. परंतु दुसऱ्यास सुख झालेले पाहून आपणांस त्याचेविषयी सहानुभूति वाटली अशी स्थिति बहुधा फारशी होत नाही. कारण हेवा, मत्सर द्वेष, स्पर्धा यांसारख्या अहंपरभावना अशा प्रसंगी सहानुभूतीस खेचून मागें ओढितात. जीन पाल रिचरने म्हटले आहे " दुसऱ्याच्या दुःखाचा वाटेकरी होण्यास आपण मनुष्यकोटींत असलो तरी पुरे आहे; परंतु दुसऱ्याचे सुखाचा वाटेकरी होण्यास आपण देवदूत असलों पाहिजे. सहानुभूतीस अवश्य अशा काही गोष्टी आहेत; त्याहि येथे सांगितल्या पाहिजेतः-ज्ञानेंद्रियांची विवक्षित स्थिति, उत्तम तऱ्हेची कल्पनाशक्ति