पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११५)

असूं नये; विचारशक्तीचा व सामाजिक भावनांचा विकास करावा.
कृति-प्रेमः- सुखमूलक व अहंपर; हिचा विकास करावा; बालोद्यान, वस्तुपाठ, चित्रकला वगैरेचा उपयोग करावा.
स्पर्धाः-या भावनेच्या मुळाशी इच्छा असते; मुलांना काम करावयास लावण्यास व शिस्त राखावयास लावण्यास या भावनेचा उपयोग होतो. ही भावना चांगली नव्हे; सबब ही कमी करणेच बरें.
स्तुतिप्रियताः-अपायकारक नाहीं; मुलांविषयी सहानुभूति दाखवावी. काहीतरी विशेष कृति केल्याशिवाय स्तुति करूं नये. नुसती पसंती केव्हांहि दाखवावी.

भाग पंधरावा.
सामाजिक भावना.

सामाजिक भावनांचा संबंध दुसऱ्याशी येतो. परंतु हा संबंध जरा भिन्न तऱ्हेचा असतो. राग, द्वेष, या अहंपर भावनांचा संबंधहि दुसऱ्याशी येतो. परंतु शत्रुत्व उत्पादक असा हा संबंध असतो. सामाजिक भावना मनुष्यामनुष्यांत प्रेमभाव उत्पन्न करितात, व यामुळे एकी होते. या भागांत प्रीति व सहानुभूति या दोन भावनांविषयींच आपणांस विचार कर्तव्य आहे, कारण शिक्षकांस यांचाच फार उपयोग होतो.

 प्रीतिः ही भावना अगदी लहानपणीं दृष्टोत्पत्तीस येते व ही काही अंशी प्रकृतिसिद्धच असते असे म्हणण्यास हरकत नाही. दुसऱ्या माणसाशी जरी या भावनेचा संबंध येतो तरी या भावनेचे बीज अहंपर आहे असे म्हणण्यास हरकत नाही मुलाची आईवर विशेष प्रीति का असते या गोष्टीचा जर आपण नीट विचार केला तर या भावनेचे बीज अहंपर कसें, ही गोष्ट सहज लक्षात येईल. परावलंबन, दुसऱ्यापासून काहीतरी विषेश लाभ, दुसऱ्याची कृपादृष्टि वगैरे प्रीतीची कारणे होत. आपण ज्यास मैत्री हे नांव देतों ती प्रीतीचाच एक प्रकार होय.