पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११२)

विकास होत नाही. स्वकृतीनेच मुले शाळेस जाण्याच्या पूर्वी कितीतरी ज्ञान मिळवितात ! तेव्हां या भावनेस योग्य वळण लावून तिचाआपल्या कामाकडे शिक्षकानें उपयोग करून घ्यावा. मुलांना बळजबरीने स्वस्थ बसावयास लावणे म्हणजे त्यांना दुःख देणे होय.ही गोष्ट शिक्षकांनी व आईबापांनी नेहमी लक्षांत वाळगावी.मुलांना स्वतंत्रतेची व अधिकाराची फार आवड असते; तेव्हा त्यांना थोडीबहुततरी स्वतंत्रता दिलीच पाहिजे; एकसारखें चरकांत धरणे बरोबर नाही. ही आवड तृप्त करण्याच्या कामी बालोद्यान, लेखन, चित्रकला, कवाईत, गायन व वस्तुपाठ या विषयांचा उपयोग करावा. बालोद्यान व वस्तुपाठ या विषयांत जर काही जादू असेल तर ती ही की, मुलें आपखुषीनें काम करण्यास प्रवृत्त होतात; अर्थात् ती जे काही करितात ते अगदी मनापासून करितात; यामुळे मिळणारे शिक्षण पक्कें असते. आपखुषीने जे काम होते त्याकरिता भीति या साधनाचा उपयोग करण्याची अवश्यकताच राहात नाही, व मुलांना चांगल्या संवयी लागतात- ( उद्योगीपणा, वक्तशीरपणा, अवधान एकाग्र करण्याची शक्ति वगैरे.)

 स्पर्धाः-ही भावना व कृतिप्रेम यांमध्ये अगदी निकट संबंध आहे. ज्या ज्या ठिकाणी बऱ्याचशा माणसांचा एकच व्यवसाय असतो त्या त्या ठिकाणी ही आढळून येते. दुसऱ्यावर वरचढ करण्याकडे अगर दुसऱ्याची निदान बरोबरी तरी करण्याकडे लहान मुलांची स्वाभाविक प्रवृत्ति असते. दुसऱ्या मुलांपेक्षा आपण चांगले व्हावे अशी त्यांची इच्छा असते; म्हणूनच ती तसे होण्याचा यत्न करितात. यावरून इच्छा हे या भावनेचे बीज असते असे म्हणण्यास हरकत नाही. मुलांचे बहुतेक कृतीत दुसऱ्यावर वरचढ करण्याची इच्छा दिसून येते. मुलांना काम करावयास लावण्याच्या कामी व शिस्त राखण्याच्या कामी ही भावना शिक्षकास फार उपयोगी पडते.मात्र तिचा दुरुपयोग करिता कामा नये.या भावनेचा एकसारखा उपयोग करीत गेल्यास मुलामुलांत वैर उत्पन्न होते व परिणाम फार भयंकर होतो.