पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११०)

शासन करील ही भीति मनांत जोपर्यंत जागृत असते तोपर्यंत बहुधा पापकर्मापासून मागे सरण्याकडे मनाची प्रवृत्ति असते. तात्पर्य, अशा तऱ्हेची भीति नैतिकदृष्टया फार महत्त्वाची असते. म्हणून प्रत्येक शिक्षकाने तिची योग्य प्रकारें जोपासना करावी.
 रागः- ही भावनाहि प्रकृतिसिद्धच असते. काहीतरी दुःख झाले म्हणजे ही जागृत होते. मनुष्याप्रमाणे इतर प्राण्यांतहि राग ही भावना दिसून येते. भिति व राग या दोन भावना स्वसंरक्षणार्थ परमेश्वराने सर्व प्राणिमात्रांचे ठायीं ठेविलेल्या असाव्या असे दिसते. जोपर्यंत ही भावना सौम्य स्थितीत असते तोपर्यंत हिच्यामुळे शरिरावर व मनावर होणारे परिणाम दिसून येत नाहीत. परंतु जेव्हां हिचा अतिरेक होतो तेव्हा मात्र सर्व शरीरभर गडबड होते. डोळे व चेहरा लाल होणे, नाकपुड्या फुगणे, दांतओठ खाणे, जोराने श्वासोछ्वास चालणे ही रागाची बाह्य चिन्हें होत. केव्हां केव्हां रागाने माणूस फिक्के पडते. रागाचा जेव्हां आपले मनावर अंमल होतो, तेव्हां मनांत नानातऱ्हेच्या कल्पना येतात. व विचारशक्ति निःशक्त होते. जो माणूस आपणांस राग आणण्यास कारण झाला असेल त्याचा केव्हां एकदां सूड घेईन असें वाढू लागतें व ही इच्छा तृप्त झाल्यावर दुःख नाहीसे होऊन एक प्रकारचे समाधान होते. ही इच्छा तृप्त न झाल्यास राग धुमसत राहतो. द्वेष, हाडवैर, वगैरे रागाचेच प्रकार होत. असो; आतां शिक्षकाने या भावनेसंबंधी काय काय केले पाहिजे ते सांगतो. शिक्षकाने दोन गोष्टी केल्या पाहिजेत- राग ही भावना थोडीबहुत दाबली पाहिजे, व थोडीबहुत राखिली पाहिजे. मुलांचा स्वभाव, रागाची कारणे व त्याचे स्वरूप यांकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांस राग आला म्हणजे लगेच तो दाबून टाकण्याचा यत्न कधीहि करूं नये. काही काळ जाऊं द्यावा. पण राग ही भावना एकंदरीत वाईटच. होतां होईल तो ही भावनाच जागृत होऊ देऊ नये. शाळेतील शिस्त फारशी कडक असू नये. शिक्षकानें नेहमी आपले आचरण