पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०९)

कधीच करावयाची नाही व करितां येणे शक्यहि नाही. ती शुद्ध करून घेतली पाहिजे म्हणजे तीपासून बरीच मदत होते. हाच नियम भीति या भावनेस लागू करावयाचा. बागुलबुवा, काळोख एखादे वाद्याचा आवाज, यांसारख्या वस्तूंनी मुलांस कधीहि भीति दाखवू नये. यामुळे अपायच होण्याचा विशेष संभव असतो. मुलांना भुताखेतांच्या गोष्टी कधीहि सांगू नयेत; मुले एखादी गोष्ट ऐकेनाशी झाली की 'बुवा आला, झोळीत घालून नेतो आतां' अशासारखे उच्चारून मुलांस भिवविणे ही मोठी चूक होय. शिक्षकानें भीतीची कारणे शक्य असेल तेथे शोधून काढावी व ती नाहीशी करावी. ज्या पदार्थामुळे अगर वस्तूमुळे भीति उत्पन्न झालेली असेल तो पदार्थ अगर वस्तु मुलास नीट दाखवावी व तीत भिण्यासारखे काय आहे ते विचारावें व ते तसे नाही असे दाखवावें. बौद्धिक विकास हे भीति या भावनेवर रामबाण औषध होय. जसजसा बौद्धिक विकास होत जातो तसतशी ही भावना नाहीशी होत जाते. पूर्वी सांगितले आहेच की, केव्हां केव्हां एक भावना कमी करण्याकरितां दुसरी वाढवावी लागते. भीति कमी करण्याकरितां धैर्य ही भावना वाढवावी. मुलांस कांहींतरी कृति करावयास लावण्याचे कामी भीति ही भावना जरी पुष्कळ वेळां उपयोगी पडते, तरीपण या भावनेचा जेवढा कमी उपयोग करून घेता येईल, तेवढे बरें. भीति दाखविल्याने मुले आपली आज्ञा पाळतील व आपण सांगू त्याप्रमाणे वागतील हें खरें; पण मन वळवून जसें काम उत्साहाने होते तसें अशा उपायांनी होणे शक्य नाही; शिवाय या भावनेचे मनावर व शरिरावर दुष्परिणाम होतात हे वर सांगितलेच आहे. एक प्रकारची भीति मात्र शिक्षकाने वाढविण्याचा अवश्य यत्न करावा. ती कोणती म्हणाल तर ज्या माणसावर आपण प्रीति करितों व ज्यास आपण पूज्य मानितों व चहातो त्याचे मन दुखविण्यास भिणें ही होय. अशी भीति अपायकारक नसते. उलट उपायकारकच असते. परमेश्वराचा कोप होईल व तो आपणांस १०