पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०७)

आणणे बरेच कठीण काम आहे. याकरितां होतां होईल तों अपायकारक भावना नच उत्पन्न होतील असें करावें. त्यांतून जर त्या उत्पन्न झाल्याच तर ज्या कारणांमुळे त्या उत्पन्न झालेल्या असतील त्यांकडे मुलांचे लक्ष न जाईल अशी तजवीज करावी. केव्हां केव्हां उच्चभावनांचा विकास केल्याने हलक्या प्रकारच्या भावना दुर्बल करितां येतात. उदाहरणार्थ, मत्सर ही भावना सहानुभूति या सामाजिक भावनेचा विकास केल्याने कमी होत जाते. आपले काम सुव्यवस्थितपणे व्हावे अशी जर शिक्षकाची इच्छा असेल तर त्याने मुलांच्या सुखाकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना काय आवडते, काय नाही हे समजून घेतले पाहिजे. तात्पर्य, मुलांच्या भावना कोणत्या तऱ्हेच्या आहेत, काय आहेत, हे अगोदर शिक्षकाने पाहिले पाहिजे.

गोषवारा.

 भावना- याशब्दाने मनाच्या स्थितीचा बोध होतो.
 भावनांचे प्रकार-- (१) इंद्रिय विकृतिज (२) मनोविकृतिज व (३) उच्च.
 कांही भावना सुखोत्पादक, काही दुःखोत्पादक व काही मिश्र असतात.
 मनास काय किंवा शरिरास काय अतिव्यायाम, व्यायामन्यूनता व अपाय यांनी दुःख होते; मितश्रम, पथ्यकारक काम यांपासून सुख होते.
 भावना व इतर मनोव्यापारः-- भावनांचा बौद्धिक व प्रवर्तक व्यापारांशी निकट संबंध आहे. याकरितां भावनांस योग्य वळण दिले पाहिजे.
 भावनांची वाढ:- भावना प्रथम जागृत होतात. मुलांच्या भावना इंद्रियविकृतिज, साध्या, अहंपर, क्षणिक व जोरदार असतात. हळू हळू सामाजिक भावना व उच्चभावना दिसू लागतात.
 भावनांचे शिक्षणः-- कांहीं भावनांवर ( अहंपर ) दाब पाहिजे.कांही ( सामाजिक ) मोकळया सोडल्या पाहिजेत. शिक्षकानें तीन