पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०४)

होण्यासहि वेळ लागत नाही; व जेव्हां राग येतो तेव्हां त्याचे स्वरूपहि उग्र असते. त्याचे कारण बुद्धीच्या कोतेपणामुळे विचाराचा अभाव, व प्रवर्तकशक्ति दुर्वल असल्यामुळे स्वतांवर दाब ठेवितां न येणे हे होय. एकंदरीत मुलांच्या भावना अगदी साध्या, अहंपर म्हणजे स्वतांविषयींच्या, बाह्य प्रेरणेमुळे उत्पन्न होणाऱ्या, जोरदार, व क्षणिक अशा असतात. प्रथमारंभी म्हणजे तान्हेपणी होणाऱ्या भावना संवेदनांहून फारशा भिन्न नसतात. नंतर अहंपरभावना (म्हणजे राग भीति यांसारख्या) दिसू लागतात. पहिल्या वर्ष दीड वर्षांत याच प्रबल असतात. पुढे काही काळ गेल्यावर सामाजिक भावना म्हणजे ज्यांचा संबंध दुसऱ्यांशी येतो त्या (उदाहरणार्थ प्रीति, दया वगैरे) दृष्टोत्पत्तीस येतात व अगदी शेवटी बराचसा बुद्धीचा विकास झाल्यावर उच्चभावनांचा उद्भव होतो. भावनांचे विकासास स्मृति व कल्पना यांचे व्यापारांची बरीच मदत होते. असो. आतां आपण भावनांच्या शिक्षणाचा विचार करूं.

भावनांचे शिक्षण

 मुलांचे भावनांना योग्य वळण लावणे हे एक शिक्षणांतील महत्त्वाचे अंग आहे. याकडे आईबापांनी व शिक्षकांनी अवश्य लक्ष दिले पाहिजे. भावनांची स्वाभाविक स्थितिच अशी कांही असते की, त्यांना काही विवक्षित मर्यादेच्या आंतच ठेविल्या पाहिजेत. पूर्वी सांगितलेच आहे, की भावना आणि बौद्धिक व प्रवर्तक व्यापार यामध्ये अगदी निकट संबंध आहे; ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे भावनांचे शिक्षणाची काय अवश्यकता आहे याविषयी खात्री होते. काही भावनांना दाबांत ठेवाव्या लागतात, व काहींना मोकळ्या सोडाव्या लागतात. उदाहणार्थ,- मुलें बहुधा शीघ्रकोपी असतात. त्यांना एकदा राग आला की मग ती शुद्धी-