पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१००)

बुद्धीचे भावनांवर, प्रवर्तकशक्तीचे भावनांवर व उलट भावनांचें प्रवर्तकशक्तीवर कार्य व प्रतिकार्य कसें एकसारखे होत असते हे ध्यानांत आले असेलच. मन हे एक आहे. त्याचे जे घटकावयव केलेले आहेत ते केवळ सोयीकरितां होत, ही गोष्ट आणखी एकवार येथे सांगितल्यावांचून राहवत नाही. असो. कोणतीहि भावना जेव्हां सौम्य स्थितीत असते, तेव्हां शरिरावर तिचे होणारे कार्य दिसून येत नाही. परंतु जर तीच भावना जोराची असेल तर तात्काल शरिरावर तिचे परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ फार राग आला म्हणजे तोंड लाल होते; रुधिराभिसरण, श्वासोच्छ्वास व हृदयाची क्रिया यांत विवक्षित फेरफार दिसून येतात. त्याचप्रमाणे मनुष्य भ्यालें म्हणजे छाती धडधडू लागते, घाम येतो, कंप सुटतो, व क्वचित् बेशुद्धिहि येते. कोणत्याहि भावनेचा अतिरेक झाल्यास विचार व प्रवर्तकशक्ति काहीएक काल पावेतों निर्बल होतात, व त्यांचे कार्य बंद राहाते. भावनेचे वर सांगितल्याप्रमाणे शरिरावर कार्य झाले की, या कार्याचे प्रतिकार्य मनावर होते. व त्यामुळे कांहीं कांहीं नवीनच भावना उत्पन्न होतात.
 भावनांची वाढः- अगदी लहानपणी म्हणजे मूल जेव्हां सरासरी महिना दोन महिन्यांचे असते तेव्हां बुद्धि व इच्छा निद्रित स्थितीतच असतात. भावना मात्र थोड्याबहुत जागृत असतात. आनंद व दुःख या भावना प्रकृति-सिद्धच असतात असें मानण्यास काही हरकत दिसत नाही. सुख व दुःख यांचा प्रथमचा अनुभव शारीरिक विकृतींमुळे होतो. त्यांतल्यात्यांत दुःख ही भावना विशेष प्रवल असते. पुढे काही कालाने नाक, कान, डोळे, वगैरे ज्ञानेंद्रियद्वारे सुखबीजक भावना होऊ लागतात व मग सुख व दुःख यांचे परिमाण सारखेच होते. लहान मुलांच्या भावना इंद्रियविकृतिज असतात. राग, भीति पहिल्याच वर्षांत दिसू लागतात, ज्या पदार्थामुळे भावना उत्पन्न होते तो पदार्थ इंद्रियपथाबाहेर नेला की, ती भावना बंद होते. मुलांना राग येण्यासहि वेळ लागत नाही व तो नाहीसा