पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०२)

गांजा ओढणे, दारू पिणे, ही व्यसने ज्यांना लागलेली असतात अशा माणसांना जर विचारले तर प्रथम प्रथम ओकारी येत असे, त्रास होत असे, परंतु आता त्याची गोडी लागली, त्यावांचून चालतच नाही, चुकल्यासारखे होते, डोके दुखू लागते, अशांसारखे उद्गार त्यांचे तोंडून निघतात. मुलांना शाळेत जाणे प्रथम प्रथम अवघड वाटते, परंतु काही काळ गेल्यावर तीच मुले मोठ्या हौसेने शाळेत जातात. मनास काय किंवा शरिरास काय, एकदां जर एखादे गोष्टींची संवय झाली की ती सुटतच नाही. तेव्हां आईबापानी व शिक्षकांनी मुलांना चांगल्या संवयी लावाव्या.
 भावनांचा इतर मनोव्यापारांशी संबंधः- जर अलग विचार केला तर त्या फारशा महत्त्वाच्या आहेत असे वाटणार नाही. परंतु बौद्धिक व प्रवर्तक व्यापारांशी त्यांचा अगदी निकट संबंध आहे, ही गोष्ट ध्यानांत आली म्हणजे त्यांचे खरें महत्त्व समजतें. बुद्धीचे विकासास भावनांचे विकासाची अवश्यकता असते. उलट उच्च भावनांचे विकासास बुद्धीचे विकासाची जरूरी असते. अभिरुचि ही भावना उत्पन्न झाल्याशिवाय कोणताहि कठीण विषय समजत नाही. याकरितांच शिक्षकाने प्रथम मुलांची जिज्ञासा जागृत करून तद्वारे जो विषय शिकवावयाचा असेल त्याची अभिरुचि उत्पन्न करावी असें पूर्वी सांगितलेच आहे. उलट सृष्टिसौंदर्याभिरुचि, देशाभिमान यांसारख्या उच्च भावना उत्पन्न होण्यास बुद्धीचा बराचसा विकास व्हावा लागतो. त्याचप्रमाणे कोणतीहि कृति करण्याची प्रवृत्ति होण्यापूर्वी तीस कारणीभूत भावना उत्पन्न व्हावी लागते. उदाहरणार्थ- एखाद्या माणसास मारण्याची प्रवृत्ति होण्याचे अगोदर त्या माणसाचा राग यावा लागतो. उलट भावनेचे ज्ञान होण्यास अवधान ठिकाणावर पाहिजे. अवधान जर ठिकाणावर नसेल तर एखाद्या माणसाने येऊन आपणांस शिवीगाळ केली तरी त्यापासून मनास काहीएक भावना होत नाही. यावरून, भावनेचे बुद्धीवर,