पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०१)

दुखू लागते. डोळे मिटून धरिले तरीहि त्रास होतो. इंद्रियांना काम म्हणून पाहिजेच. मात्र तें पथ्यकारक पाहिजे, म्हणजे त्यापासूच सुख होते. एखादे इंद्रियाचे कामांत जर अडथळा आला तरीहि दुःख होते. एखादे चपल मुलास जर एके ठिकाणी स्वस्थ बसवून ठेविलें, कोणत्याहि वस्तूस हात लावू दिला नाही, काहीएक बोलू दिले नाही, तर त्यास दुःख होतें. या वरील उदाहरणांवरून आपणांस खाली दिलेले दोन नियम काढितां येतील.
 (१) कोणत्याहि इंद्रियास, शरिराचे भागास, अगर मनास अति व्यायाम झाल्याने, अगर व्यायामांत कांहीं न्यूनता झाल्याने, अथवा त्यास अपाय झाल्याने, किंवा त्या इंद्रियास योग्य असे जे काम त्यांत अडथळा आल्याने दुःखमूलक भावना उत्पन्न होते; २) तसेंच मितश्रम व पथ्यकारक काम, शरिरास अगर मनास मिळाल्याने त्यांपासून सुखमूलक भावना उत्पन्न होते. सुखमूलक व दुःखमूलक भावनांसंबंधी आणखी एकदोन किरकोळ गोष्टी सांगितल्या पाहिजेत. एखादी अपरिचित वस्तु जेव्हा आपण प्रथम पाहातो तेव्हा तिच्यापासून मनास एकप्रकारचे समाधान होतें. तीच वस्तु जर एकसारखी पाहण्यांत येऊ लागली तर हळू हळू समाधानाचा भाग कमी होत जाऊन तीच वस्तु कंटाळवाणी वाटू लागते. यावरून असे दिसते की, मानसिक स्थितीचे ( भावनेचें ) सुखजनक स्वरूप काही काळ टिकावें अशी जर इच्छा असेल तर ती स्थिति ज्या अनुभवामुळे उत्पन्न झालेली असेल त्यांत काहीतरी फेरबदल होत गेला पाहिजे. तेच तेच अन्न दररोज खात गेल्याने जसा त्याचा आपल्या जिभेत वीट येतो तशीच स्थिति मनाची आहे. आरंभी आरंभी ज्या एखाद्या कृतीने आपणांस असमाधान अगर दुःख होते तीच कृति पुढे पुढे पुनरावृत्तीने सुखद होते. आपले इंद्रियांचेच स्थितीत काहीएक तऱ्हेचा फेरबदल होतो, त्यांचे स्वरूप पालटते; अर्थात् त्यामुळे त्यांचे गुणधर्महि पालटतात, असे म्हणण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ-