पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१००)

यविकृतिज भावना होत. या ठिकाणी शरिरास काहीतरी प्रथम विकृति (मग ती सुखजनक असो वा दुःखजनक असो) व्हावी लागते. राग, आनंद, प्रीति, द्वेष, स्पर्धा, आदर या मनोविकृतिज भावना होत. यांचे उत्पत्तीस बौद्धिक व्यापार कारणीभूत होतात. शत्रूचे स्मरण झाल्याबरोबर त्वेष येणे, तसेच एखाद्याच्या दीन स्थितीचे वर्णन ऐकल्याबरोबर मनांत त्याचे विषयी कीव उत्पन्न होणे, यांसारख्या व्यापारांत अगोदर मतास काहीएक ज्ञान व्हावे लागते व नंतर भावना उत्पन्न होतात. स्वदेशाभिमान, सत्यप्रीति, ज्ञानाभिरुचि, कर्तव्याभिरुचि, या उच्च भावना होत. काही भावना सुखोत्पादक असतात, काही दुःखोत्पादक असतात व कांहीं मिश्र असतात. आनंद, आराम या सुखोत्पादक व राग, भीति या दुःखोत्पादक भावना होत. खरजेचा फोड खाजविला असता मनास जो कांहीं विकार होतो त्यांत थोडेसें सुख असते व थोडेबहुत दुःखहि असतेच. हे मिश्रभावनेचे उदाहरण समजावे. एकंदरीत कोणत्याहि भावनेचे बीज सुखदुःखांत असते. तेव्हां प्रथम आपण सुख व दुःख यांची उत्पत्ति कशी होते ते पाहूं.
 कोणत्याहि इंद्रियास (यांत मेंदूचाहि समावेश होतो) बेताचे श्रम झाले तर त्यांपासून सुख अगर समाधान होते. याला ' बरें वाटते ' असे आपण नेहमी म्हणतो. वाजवीपेक्षा जास्त श्रम झाले तर त्यांपासून असमाधान अगर दुःख होतें. आपण व्यायामाचेच उदाहरण घेऊ. मितव्यायाम केल्यास शरिरांत एक प्रकारची तरतरी उत्पन्न होते. अति व्यायामाने त्रास होतो. मुळीच व्यायाम न केला, अगदी स्वस्थ बसून राहिलों, तरीहि अस्वस्थता उत्पन्न होते. आणखीहि एक दोन उदाहरणे घेऊ. मानसिक श्रम बेताबाताने केल्यास मेंदू तरतरीत राहातो. अर्थात् यामुळे समाधान(सुख) होते. मुळीच न केल्यास अस्वस्थता ( दुःख ) वाटते. फार मानसिक श्रम केल्यास डोके भणाणून जाते, कपाळ दुखू लागते, त्रास होतो. सौम्य प्रकाशाने डोळ्यांत बरे वाटते; तोच जर प्रखर प्रकाश असला तर डोळे दिपतात, अंधारी येते व केव्हां केव्हां कपाळहि