पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९८)

ज्ञानार्जनाचा काल आला असे समजावें. व मग गणितासारखे उच्चप्रतीचे विषय शिकविण्यास आरंभ करावा.याचा अर्थ बेरीज वजाबाकी शिकवावयास लागावे असा नाही, तर अनुमानाची ज्यांत गरज लागते असे गणितांतील भाग शिकवावयास लागावे असा होय. आरंभी सोपे विषय घ्यावे. नंतर कठीण घ्यावे. प्रथम गणित, नंतर भूमिति नंतर वनस्पतिशास्त्र, नंतर रसायनशास्त्र व त्याचे मागून शरीरशास्त्र, अशासारखा काहीतरी क्रम असावा. असा; येथवर बौद्धिक व्यापार कोणते, त्यांचे सामान्यस्वरूप कशा प्रकारचे असते आणि शिक्षणाचे कामी त्याकडे लक्ष दिल्याने कसा फायदा होतो, यांविषयी सांगितले. आतां मनाचे दुसरे अंग, ज्यास आपण भावना हे नांव दिलेले आहे, त्याकडे वळू.

गोषवारा.

 अनुमान- सर्व मनोव्यापारांत अनुमान हा व्यापार अत्युच्च होय. एक निर्णय व दुसरा निर्णय यांमधील संबंध अनुमानांत ठरतो.
 अनुमानाचे तीन प्रकार- (१) उद्गामी अनुमान (२) अवगामी अनुमान व ( ३ ) सादृश्यानुमान.
 उद्गामी अनुमानांत विशेष गोष्टींवरून सामान्य सिद्धांत निघतो व अवगामी अनुमानांत सामान्य सिद्धांतापासून विशेष गोष्ट सिद्ध होते. ( पृष्ठ ८९ पहा ).
 सादृश्यानुमानः- दोन वस्तूंमधील सादृश्य पाहून त्यावरून काहीतरी सिद्धांत निघतो. ज्योतिषशास्त्रांत या प्रकारच्याच अनुमानांचा एकसारखा उपयोग केलेला आढळतो.

 अनुमानशक्तीचा विकासः- (१) मुलांस बोलतां येऊ लागले की अनुमानाचे विकासास आरंभ झाला असे समजावें. (२) मुलांची अनुमाने कोती असतात. (३) बुद्धीचा विकास होऊ लागला म्हणजे अनुमानाचे स्वरूप पालटते ( ४ ) अनुमानशक्तीचा विकास कसा करावा या संबंधी तर्कशास्त्रांत काही नियम दिलेले आहेत; त्यांत शब्दांचे अर्थ, सामान्य कल्पना व निरीक्षण यांकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगितले आहे.