पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९७)

तर त्यांस निवडक निवडक गोष्टीच नुसत्या सांगाव्या. त्यांतील कार्यकारणभावाकडे फारसे लक्ष देण्याची जरूरी नाही.यावेळी विषयाची अभिरुचि उत्पन्न करणे हाच काय तो आपला इष्ट हेतु असावा. त्याचप्रमाणे विचारशक्तीस शिक्षण देतांना दृश्य वस्तूंचा उपयोग आरंभी करावा. संख्या, मिळवणी, वजाबाकी हे भाग शिकवितांना गोट्या, चिंचोके, बारीक बारीक दगड, या जिनसांचा उपयोग करावा. अदृश्य कल्पनांची ओळख तद्वारे करून द्यावी. ' दृश्य गोष्टींपासून निघावे व अदृश्याकडे जावें;' ' परिचित गोष्टीचे अगर वस्तूंचे द्वार अपारेचित वस्तूंची अगर गोष्टींची ओळख करून द्यावी;' ' आरंभी जे सोपें असेल ते सांगावे, व नंतर कठिणाकडे वळावें; ' हे अध्यापन शास्त्रांतील तीन महत्त्वाचे नियम प्रत्येक शिक्षकानें सदैव ध्यानात बाळगावे. कोणताहि विषय शिकवितांना जेथे जेथे म्हणून शक्य असेल तेथे तेथे उद्गामी आणि अवगामी या दोन्ही पद्धतींचा उपयोग करावा. उदाहरणार्थ व्याकरण शिकवितांना उदाहरणे घ्यावी व त्यांचे परीक्षण करून नियम काढावा. फिरून उलट नियम घेऊन त्यात समावेश होणारी उदाहरणे दाखवावी व तेणेंकरून त्या नियमाची सत्यता सिद्ध करावी, असे केल्याने मुलांचे मनांत एक प्रकारचा तरतरीतपणा येईल. स्पेन्सर म्हणून जो मोठा नामांकित तत्त्ववेत्ता एकोणिसावे शतकांत इंग्लंडांत होऊन गेला तो वर सांगितलेल्या उद्गामी आणि अवगामी पद्धतींचा मोठा पुरस्कर्ता होता. आपण मुलांना होता होईल तितके कमी सांगावें. ज्या शिक्षण पद्धतीचा कल सर्व काही मुलांना सांगण्याकडे असतो व प्रसंगानुसार सांगितलेले त्यांचेकडून एकदां ओकवून टाकविण्याकडे असतो ती सदोष पद्धति होय. शिक्षण नेहमी मुलांचे मानसिक शक्तीचे सामर्थ्यानुरूप असावे, व जें शिकवावयाचे असेल त्याची मांडणी नीट व्यवस्थेशीर करावी. बौद्धिक विकासाच्या बाल्यावस्थेंत, निरीक्षण स्मरण व कल्पना या शक्तींनीच शिक्षण देण्याचा यत्न करावा, व या कामी उपयोगी पडणारेच विषय घ्यावे. मुले साधारणपणे तेराचवदा वर्षांची झाली म्हणजे पद्धतशीर ९