पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९६)

करिते, यावरून सोनकिडा सोने तयार करितो हे अनुमान; त्याचप्रमाणे मासा व माशी ही एकाच जातीतील असावी हे दुसरे अनुमान. ही प्रवृत्ति नाहीशी करण्याचा शिक्षकाने अवश्य प्रयत्न केला पाहिजे.
 आता शाळांतून शिकविले जाणारे जे निरनिराळे विषय आहेत त्यांपैकी विचारशक्तीचा विकास करण्याचे कामी, विशेषतः अनुमानशक्तीचे विकासास, कोणते विषयांचा विशेष उपयोग होतो ते पाहूं.--इतिहास व भूगोलांतील काही काही भाग ( उदाहरणार्थ, सृष्टिचमत्कारांची कारणे ) यांचा या कामी बराचसा उपयोग होतो. इतिहास शिकणे म्हणजे निरनिराळ्या घडून आलेल्या गोष्टींमधील कार्यकारणभाव समजणे व त्यांतील महत्त्व जाणणे होय. रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र यांसारख्या शास्त्रीय विषयांचा तर अनुमानशक्तीचे संवर्धनाचे कामी विशेष उपयोग होतो. निरीक्षण, प्रयोग, सादृश्य शोधून काढणे व सामान्य नियमस्थापना करणे यांची या विषयांत भरती असते व याच गोष्टी उद्गामी-अनुमानास अवश्य लागणाऱ्या आहेत. गणित, भूमिति हे विषय अवगामी अनुमानशक्तीचा विकास करितात. या विषयांतील सामान्य तत्त्वे अगदी सोपी व स्वयंसिद्ध अशी असतात. मनास व्यवस्थिशीरपणा व टापटीप शिकविण्याच्या कामी व विचारसरणीस एक प्रकारची शिस्त लावण्याचे कामी, विशेषेकरून तीत मेळ कसा असावा हे दाखविण्याच्या कामी, गणित व भूमिति या विषयांचा अत्यंत उपयोग होतो. या विषयांचा कोणताहि भाग शिकत असतांना अवधानशक्ति एकाग्र करावी लागते, नाहीतर काहीएक बोध होत नाही.
 अध्यापनाचा क्रमः- शिक्षकाचे मुख्य कर्तव्य मुलांना ज्ञानामृत पाजून त्यांच्या मनाचा पूर्ण व समतोल विकास करणे हे होय. हे साध्य होण्याकरितां अध्यापनांत विवक्षित पद्धति व क्रम यांची जरूर असते. उदाहरणार्थ,-अगदी लहानपणी म्हणजे बारातेरा वर्षांचे आंतील मुलांस इतिहास शिकवावयाचा असेल