पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९५)

विचारशक्तीचे मदतीने मुलांना ग्रहण करण्यास उत्तेजन द्यावे.मुलांचे प्रश्नांची शक्य असल्यास उत्तरे देऊन त्यांचे समाधान करावें; मात्र ऐतिहासिक गोष्टी अगर धर्मपुराणांतील कथा यांसंबंधी मुलांना प्रश्नच करूं देऊं नये; मुलांचे बुद्धीचा जसजसा विकास होत जाईल तसतसे त्यांना स्वतंत्रपणे निर्णय करू द्यावे.मुलें प्रथम व्यावहारिक बाबीसंबंधी निर्णय करूं लागतात. नैतिक गोष्टींसबंधी निर्णयास बराच काल जावा लागतो.
 आतां आपण विचारशक्तीच्या शिक्षणाचे दुसरें अंग-म्हणजे अनुमानशक्तीसं योग्य वळण लावणे-याविषयी विचार करूं. लहानपणी आईनें व दाईने मुलांचे प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांची जिज्ञासा तृप्त करावी. मुलें ज्या ज्या गोष्टी पाहातात त्यांची कारणे समजण्याची त्यांना फार उत्कंठा असते. केव्हां केव्हां त्यांनाच ही कारणे शोधून काढावयास लावावें. लॉक म्हणून जो प्रसिद्ध तत्ववेत्ता होऊन गेला त्याचे मत मुलांचे जिज्ञासेला उजेजन द्यावे, व ती वाढवावी असे होते. रुसो म्हणून जो दुसरा एक मोठा तत्ववेत्ता फ्रान्स देशांत होऊन गेला, ( त्याचेसंबंधी पूर्वी एकदा उल्लेख केला आहेच. ) त्याचे मत याहून भिन्न त-हेचे होते, म्हणजे अगदी उलट होते. असो; याविषयी आपणांस येथें विचार कर्तव्य नाही. आईबापांनी व शिक्षकांनी मुलांस आपलेभोवती काय काय नानाविध चमत्कार व घडामोडी चालल्या आहेत तें पाहावयास लावावें, व त्यांविषयी मुलांची जिज्ञासा जागृत करावी. त्यांचे प्रश्नांची आपण उत्तरे द्यावी आणि शिवाय आपणहि त्यांना तत्संबंधी प्रश्न करावे. तात्पर्य, मुलांना चौकसपणाची संवय लावावी. कोणताहि सामान्य नियम मुलांना सांगितला की त्याची व्यापकता त्यांना दाखवावी. संदिग्ध शब्द व भाषा किती घातुक असते हे उदाहरणांनी दाखवावें. पूर्ण विचार केल्याशिवाय ठरविलेले सामान्य सिद्धांत कसे चुकीचे ठरतात हे नीट समजून सांगावें. केवळ शब्दसादृश्यावरून अनुमान करण्याकडे मुलांची प्रवृत्ति असते. उदाहरणार्थ - मधमाशी मध तयार