पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९३)

कांही नियम दिलेले आहेत. त्यांतील महत्त्वाचे एकदोन नियम येथे दिले पाहिजेत. यथार्थ व स्पष्ट असा सामान्यबोध व निर्णय यांची आपलेजवळ पुरे इतकी सामुग्री असल्याशिवाय अनुमान हा व्यापार बरोबर होणे शक्य नाही. सबब या गोष्टींकडे अगोदर लक्ष द्यावें, व नंतर एक निर्णय व दुसरा निर्णय यांमधील संबंध काय आहे, कसा आहे, हे अगदी बारकाईने पहावें. हा एक तर्कशास्त्राने सांगितलेला सामान्य नियम होय. दुसरा नियम उद्गामी अनुमानासंबंधी आहे:-उद्गामी अनुमान सुरळीत, यथार्थ व स्पष्ट व्हावे याकरितां पुष्कळ गोष्टींचे निरीक्षण व परीक्षण फार बारकाईने व सावधगिरीने करावे व एकदम घाईने एखादा सामान्य सिद्धांत ठरवू नये. ज्या गोष्टी आपल्या दृष्टोत्पत्तीस येतील त्यांचे नीट पृथक्करण करावे व त्यांतील प्रधान अंगें अगर कारणे कोणती व गौण कोणती हे अगोदर पाहावें; शक्य असेल तेथे निरीक्षण व प्रयोग यांची सांगड घालावी. समजा की, आपणांस ज्वलन म्हणजे काय, त्याची कारणे काय वगैरेसंबंधी माहिती मिळवून सामान्य सिद्धांत ठरवावयाचा आहे. निरनिराळे जळणारे पदार्थ घेऊन ते जाळल्यानंतर कोणती द्रव्ये उत्पन्न होतात, त्यांपैकी अवश्य कोणतीं, ती कशी बनतात, कां बनतात, हे पाहिले पाहिजे. मेणबत्ती जाळावी, ती जाळल्यानंतर कोणते पदार्थ उत्पन्न होतात ते पाहावें. त्याचप्रमाणे राकेलचा दिवा, गोडे तेलाचा दिवा, तुपाचा दिवा जाळून काय काय द्रव्ये त्यांपासून निघतात ते पाहावे.अशाच त-हेचे आणखी पुष्कळ प्रयोग करून पाहावे. ( प्रयोग जितके जास्त त्या मानाने ठरविलेल्या सामान्य सिद्धांताचा बरेवाईटपणा असणार.) म्हणजे ज्वलन होण्यास जळणारे वस्तूंतील द्रव्य व हवेतील आक्सिजन (प्राणवायु ) यांमध्ये रासायनिक संयोग झाला पाहिजे असा सामान्य सिद्धांत निघेल. असो; तिसरा महत्त्वाचा नियम अवगामी-अनुमानाविषयींचा आहे. या अनुमानांत भिन्न भिन्न गोष्टीतील साम्य शोधून काढावे लागते. मुख्य चूक जी नेहमी होते ती तारतम्याभावामुळे अगर शब्दांचे अर्थ बरोबर न