पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९१)

मांनी अनुमानाचा खरेखोटेपणाहि ठरवितां येतो. असो; आतां आपण अनुमानशक्तीचा कसकसा विकास होत जातो ते पाहूं.

अनुमानशक्तीचा विकास.

 पहिल्या प्रथम अनुमानशक्ति मुलांचे ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येणाया इतर प्रकृतिसिद्ध व्यापारांसारखीच असते असे दिसतेः-उदाहरणार्थ, एखादे फळ मुलास खावयास दिले असता त्याच्या चवीसंबंधी मूल कांहीएक अनुमान करिते. यास पूर्वानुभवाचा अगर दुसऱ्या कोणत्याहि गोष्टीचा आधार असतो असें म्हणतां येत नाही. त्याचप्रमाणे लहान तान्ह्या मुलांच्या आकांक्षा अशाच त-हेच्या अनुमानशक्तीच्या व्यापारदर्शक समजाव्या. घंगाळांत आई पाणी उपसू लागली की, मूल चेहरा वाईट करून पुढे काय प्रसंग येणार ते दर्शविते; मात्र या व्यापारास पूर्व संस्काराचे स्मृतीचा थोडाबहुत आधार असतो. मुलांस बोलता येऊ लागले की अनुमानशक्तीचे विकासास आरंभ झाला असे समजावें. आरंभी आरंभी मुलें जी अनुमानें बांधितात ती त्यांचे उतावीळ स्वभावानुरूप असतात.कोणतीहि एखादी गोष्ट पाहिली की तिचे कारण काय वगैरेविषयी मुलांना जिज्ञासा उत्पन्न होते व त्या शोधास ती लागतात. एक गोष्ट घडून आली की, दुसरी तिचे मागून, नंतर तिसरी अशी परंपरा मुलें पाहातात; व वडील माणसांचे तोंडूनहि 'अमुक गोष्ट झाली त्याचे कारण असें,' अशासारखे उद्गार बाहेर पडतांना ऐकतात; तेणेकरून मुलांची चौकसबुद्धि साहजिकच जागृत होते.मुलांचे अनुमानशक्तीच्या व्यापाराचा मासला खाली दिलेल्या काही उदाहरणांवरून ध्यानात येईल.
 (१) दोन वर्षांच्या मुलाने एकदो साखर पाण्यात विरतांना पाहिली होती. तेच मूल आपल्या आईस म्हणाले-'आई, मी या पाण्यांत भाकरी टाकतो म्हणजे ती त्यांत विरघळेल, नाही बरें !"

 (२) एकदां एक लहान मूल म्हणाले-गाय पांढरी आहे, तिचे दूध पांढरे आहे. म्हैस काळी म्हणून तिचें दूध काळे !'