पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६२)

अमुक एका कृतीबद्दल कधीहि बक्षीस देऊ नये, तर शाळेतील कामात सतत उद्योग, वक्तशीरपणा, टापटीप या गुणांबद्दल बक्षीस द्यावें. शिक्षा ज्याप्रमाणे अपराधाचे मानाने असावी त्याप्रमाणेच बक्षीसहि गुणांचे मानाने ठरवावें; बक्षिसांचा दुरुपयोग कधीहि करूं नये. हल्ली शाळांतून पुस्तकें बक्षीस देत असतात; परंतु ही पुस्तकें जी मुलें शहाणी असतात व ज्यांचा नंबर परिक्षेत वर येतो अशांच्याच वांट्यास जातात; यामुळे स्पर्धा मात्र उत्पन्न होते व या बक्षिसांचा हितकारक परिणाम पहिल्या एक- दोन मुलांवरच होतो. जी मुले सदाचरणी व सद्गुणी असतात अशांना खरोखर बक्षिसे द्यावयास पाहिजेत. या वर दिलेल्या शिस्तीसंबंधाच्या बहुतेक गोष्टींविषयी सविस्तर विचार अध्यापनशास्त्रासंबंधी जी एकदोन पुस्तकें मराठी भाषेत झालेली आहेत त्यांत केला आहेच. प्रवर्तक व्यापारांवर योग्य दाब ठेवणे याचाच अर्थ शिस्त; म्हणून या ठिकाणी याविषयी थोडासा विचार केला. शिस्तीचा एक विशेष प्रकार आहे तोहि येथे महत्त्वाचा असल्यामुळे सांगितला पाहिजे.
 अनुभवभूलकशिस्त---याचा अर्थ अनुभवाने शहाणपणा शिकावयाचा असा आहे. ठेचा लागल्याशिवाय व टक्केटोणपे खाल्याशिवाय मनुष्य शहाणे होत नाही असे जे आपण म्हणतों त्याचा अर्थ तरी हाच. या शिस्तीतील तत्त्व असे आहे की, स्वाभाविक शिक्षेने जसा सुपरिणाम होतो तसा कृत्रिम शिक्षेनें होत नाही. उदाहरणार्थ एखादे मुलाने विस्तवास हात लाविला की त्याचा हात तात्काळ भाजतो, व त मूल पुनरपि विस्तवास हात लावीत नाही. हा शहाणपणा तें अनुभवाने शिकते. अशा रीतीने होणारी शिक्षा स्वाभाविक असते. ती योग्य असते असें मात्र म्हणता येणार नाही. एखादें लहान मूल अज्ञानामुळे विहिरीत वाकून पहाते व ते विहिरीत पडण्याचाहि संभव असतो; अशा स्थितीत भोगू दे आपल्या कर्माची फळे' असे म्हणणे किती घातुक होईल बरें ? शिवाय शिक्षा नेहमीच होते असें नाहीं