पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६०)

उपाय होय. असो. आतां शारीरिक शिक्षेसंबंधी विचार करूं:- शारीरिक शिक्षा देखील शेवटचाच उपाय होय. कांही भयंकर गुन्हामुलांनी केला तरच हिचा उपयोग करावा. शारीरिक शिक्षा अति कडक अशी कधीहि असू नये. मान व अपमान यांतील भेद ज्या मुलांना समजतो त्यांचेवरच हिचा सुपरिणाम होण्याचा संभव असतो. मुलांचे वयाकडेहि लक्ष द्यावे. जेव्हां मुले मुद्दाम नियमांचे उल्लंघन करितात तेव्हां त्यांना छड्या मारणे, हीच शिक्षा योग्य. गालफडावर अगर डोक्यावर कधीहि मारूं नये; एखादे वेळी अपघात होण्याचा संभव असतो. त्याप्रमाणेच रागाचे आवेशांत शिक्षा देऊ नये; कारण अशी शिक्षा विशेष जबर असते. बौद्धिक अपराधाबद्दल शारीरिक शिक्षा कधीहि देऊ नये. काही काही मुलें फार मंदमति असतात, अशांना नेहमी उत्तेजन द्यावें, शिक्षा करूं नये.

 बक्षिसें:- शिस्त आली की तीबरोबर आज्ञाधारकपणा हां आलाच; व आज्ञाधारकपणास आत्मसंयमनाची जरुरी असते. आत्मसंयमन करणे हे काम जरा कठीण आहे. मुले आपखुशीने हे काम करीत नसतात. काहीतरी आमिष पाहिजेच. सर्व मुलांना सुखाची आवड असते व ही आवड बक्षिसांनी तृप्त होते. आणखी एक गोष्ट अशी की मुलांची बुद्धि कोती असते; तेव्हां शिक्षकाने घालून दिलेल्या नियमांतील उद्देश त्यांना ग्रहण करितां येत नाही. शाबासकी, यांत वर नंबर देणे, पुस्तकें बक्षीस देणे, काही विशेष हक्क देणे ( वर्गाचा सेक्रेटरी करणे ), हे बक्षिसाचे निरनिराळे प्रकार होत. मुलांना शाबासकी केव्हां द्यावी अगर त्यांची स्तुति केव्हां करावी व निंदा केव्हा करावी हे समजण्यास मुलांचे स्वभावाची चांगली ओळख पाहिजे. एकसारखें मुलांना दोष देत गेल्यास त्याचा कांहींच परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे एकसारखी स्तुति केल्याने मुलांना स्तुतीचीच हाव सुटते. शिक्षा व बक्षिसे या दोहींचाहि उपयोग तात्पुरताच करावयाचा हे नेहमी ध्यानात ठेवावें. कर्तव्याभिरुचि उत्पन्न करणे हे अंतिम साध्य होय. बक्षिसे देण्यासंबंधी काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत त्या येथे सांगितल्या पाहिजेत.