पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६०)

मी तुला शिक्षा देतों; शिक्षा देण्यासंबंधी शिक्षकाने एकदोन सामान्य नियम लक्षात ठेवावें-(१) फक्त एक वेळ अपराध झाला की लगेच कधीहि शिक्षा करूं नये. अपराधाची पुनरावृत्ति झाली तरच शिक्षा करावी; व ही शिक्षा करण्यापूर्वी अपराध मुद्दाम केलेला आहे किंवा काय या गोष्टीचा विचार करावा. (२) अपराध ज्या प्रकारचा असेल त्याचा विचार करून शिक्षा कोणती करावयाची ते ठरवावें. साध्या अपराधाबद्दल साधी शिक्षा, व एखादा भयंकर अपराध असेल तर शिक्षाहि तशाच प्रकारची असावी. (३ ) वर्गातील सर्व मुलांना एकेच वेळी कधीहि शिक्षा करूं नये, व शिक्षा वरचेवरहि करूं नये. कारण मुलें कोडगी बनतात. (४) शिक्षा करणे आपणाला स्वतःला आवडत नाही, परंतु निरुपायास्तव ती करावी लागते, अशाविषयी शिक्षकाने मुलांची खात्री करावी. (५) मुलानें अपराध केला की लगेच शिक्षा करूं नये; व एखादा मोठा नैतिक गुन्हा जर कोणी केला तर त्याला शिक्षा एकांतांत करावी; सर्व मुलांसमक्ष करू नये.
 शिक्षेचे बरेच प्रकार आहेत ते येणेप्रमाणे:- (१) निंदा; (२) अपमान; (३) बंदी; (४) शाळेतून हाकलून देणे; (५) शारीरिक शिक्षा; (६) घरी काही पाठ वगैरे करावयास लावणे वगैरे. यांपैकी केव्हां कोणती शिक्षा द्यावी यासंबंधीं ठाम काहीच सांगता येणार नाही. तें शिक्षकाने परिस्थित्यनुरूप ठरवावें. तथापि काही सामान्य नियम येथे देतो.-शिक्षा म्हणून घरी काही पाठ नेमून देणे ही चूक होय. असे केल्याने अभ्यासाबद्दल मुलांना तिटकारा मात्र उत्पन्न होतो. लहानसहान अपराधांबद्दल अपमान ही उत्तम शिक्षा होय. मार्क थोडे देणे, नंबर खाली देणे, यांसारख्या गोष्टींनी मुलांस, विशेषेकरून लहान मुलांस तरी, फार वाईट वाटते. मोठ्या अपराधाबद्दल बंदी हा उत्तम उपाय होय. मुलांस खेळ खेळू न देणे, सर्व वर्ग सुटला तरी शाळेत बसवून ठेवणे वगैरे बंदीचे निरनिराळे प्रकार होत. निंदा फारशी करूं नये हेच बरें; कारण तेणेकरून दुष्परिणामच बहुधा होतात. शाळेतून हाकलून देणे हा अगदी शेवटचा