पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५९)

वर दाब हा आलाच; कारण नियम करण्यांत तरी हाच उद्देश असतो. नियम फार कडक असू नयेत व ते जितके कमी असतील तितके चांगले. एकदां कोणताहि नियम केला की मग त्याची अम्मलबजावणी निःपक्षपाताने व विचाराने केली पाहिजे.
 प्रथम शिक्षकानें कोणत्याहि उपायांनी मुलांना आज्ञाधारकपणाची संवय लावावी, व मुलांचे प्रेम संपादन करावें. मुले इमानेइतबारे आपले काम करू लागली, व आनंदाने शिक्षकाची आज्ञा पाळू लागली, सद्गुणांवर त्यांचे प्रेम बसू लागले व तदनुरूप त्यांचे वर्तन होऊ लागले म्हणजे शिक्षकाने आपली शिस्त अगदी बरोबर चालली आहे असे समजावें.
 मुलांस योग्य वळण लावण्यास शिक्षकाचे हाती दोन साधनें असतात.-(१) शिक्षा व (२) बक्षिसें.
 शिक्षा:-- मुलांवर दाब हा पाहिजेच. कां तें वर सांगितले आहेच. शिक्षेशिवाय नियमांची अंमलबजावणी होणे शक्य नसते, व ही जर न झाली तर नियमांचा तरी काय उपयोग? मुलांनी आज्ञाधारक बनावें व आपले वर्तन चांगले ठेवावे यासाठी त्यांना शिक्षा करावयाची; म्हणून एकदा मुलांना चांगल्या सवयी लागल्या म्हणने शिक्षा देण्याचा उद्देश सफल झाला असे समजावें. शिक्षा करणे एकंदरीत विचार करितां वाईटच; कारण शिक्षा करणे म्हणजे काहीतरी दुःख देणेच होय. शिक्षक व मुले यांमधील प्रेम शिक्षेमुळे नाहीसे होण्याचा फार संभव असतो. शिक्षेचा दुरुपयोग झाल्यास मुलाचे मनांत द्वेषबुद्धि उत्पन्न होते, व केव्हां एकदां शिक्षकाचा सूड घेण्याची संधि मिळेल म्हणून ती वाट पहात बसतात. शिक्षेने होणारे कार्य बरेचसें संकुचित असते, व तें प्रतिबंधक असेंच बहुधा असतें. अपराध्यास ताळ्यावर आणणे हा शाळेत शिक्षा देण्याचा मुख्य हेतु असतो; परंतु मॅजिस्ट्रेट अगर न्यायाधीश शिक्षा करितात ती या उद्देशाने नव्हे; तर दुसऱ्यांनी अपराध करूं नयेत व इतरांना वचक बसावा म्हणून करितात. एकदा एक मॅजिस्ट्रेट गुन्हेगारास उद्देशून म्हणाले 'तूं चोरी केलीस म्हणून मी तुला शिक्षा करीत नाही, पण अशा चोऱ्यां होऊ नयेत याकरितां