पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५८)

होय. आणखी आज्ञाधारकपणाचा एक प्रकार आहे; त्यास यांत्रिक आज्ञाधारकपणा असें म्हणावयास हरकत नाही:- शिक्षकाने काहीहि सांगावयाचें व मुलांनी तें निमूटपणे ऐकावयाचें. संवयीने ही गोष्ट साध्य होते, नाही असे नाही; परंतु शील दुर्बल रहाते. खरा आज्ञाधारकपणा मुलांचे अंगी आणण्यास शिक्षकाचे मुलांवर प्रेम पाहिजे व त्यांचेविषयी सहानुभूति पाहिजे. शिक्षकाचा शारीरिक व नैतिक श्रेष्ठपणा मुलांनी आनंदाने व आपखुशीनें कबूल केला पाहिजे, बुद्धीचा थोडाबहुत विकास झाल्याविना अशी स्थिति होत नाही. आरंभी आरंभी यांत्रिक आज्ञाधारकपणाच मुलांचे ठायीं आणिला पाहिजे. काही काळ गेला म्हणजे मुलांना वाजवी गोष्ट कोणती गैरवाजवी कोणती हे कळू लागते. शिक्षकाचे आपल्यावर प्रेम आहे, व आपले कल्याणार्थ शिक्षकाचा प्रयत्न असतो, यांविषयी मुलांची खात्री होऊ लागली म्हणजे त्यांचे अंगी खरा आज्ञाधारकपणा येत जातो. अधिकार व आज्ञाधारकपणा यांमध्ये अगदी निकट संबंध आहे. तेव्हां शिक्षकाने मुलांवर कां व कसा आधिकार चालवावा वगैरेविषयी विचार करूं.
 शिक्षकाचा अम्मल अथवा मुलांवर चालविण्यात येणारा अधिकारः- अम्मल या शब्दाचा अर्थ वरिष्टाचा आपले हाताखालच्या माणसांच्या कृतींवर असणारा दाब असा आहे. लहानपणी मुलांची स्थितिच अशी असते की त्यांचेवर दाब हा पाहिजेच. मुलांचे कृतींवर जर दाब ठेविला नाही तर त्यांचे शरिरास अपाय होण्याचा संभव असतो. दुसरी गोष्ट अशी की मुलांचे कृतीमुळे दुसऱ्यांस अपाय अगर त्रास होण्याचाहि केव्हां केव्हा संभव असतो. याशिवाय मुलांस नैतिकशिक्षण देणे हाहि एक मुलांवर दाब ठेवण्याचा हेतु असतो. मुलांचे नैसर्गिक प्रवृत्तींना योग्य वळण लावण्याकडे व त्यांना सद्वर्तनाच्या संवयी लावण्याकडे आरंभापासून शिक्षकाचे लक्ष असते.
 अधिकार अगर अम्मल चालविणे हे काम काही ठराविक नियमांप्रमाणेच झाले पाहिजे; व नियम आले की त्यांबरोबर कृती-