पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५७)
भाग एकविसावा.
प्रवर्तक-शक्तीचे उच्च शिक्षण.

 एका सुप्रसिद्ध तत्ववेत्त्याने असे म्हटले आहे की मनुष्याची प्रवर्तक-शक्ति मोठी प्रचंड शक्ति होय. या शक्तीचेच हातीं मनुष्याचें नशीब असते म्हटले तरी चालेल; तेव्हां या शक्तीस शिक्षण हे अवश्य पाहिजेच. हे शिक्षण देण्यास शिक्षकास ज्या काही साधनांचा उपयोग करितां येण्यासारखा आहे ती साधने-अध्यापन, हुकूम, शिस्त, उपयुक्त संवयी लावणे वगैरे होत. यांपैकी बहुतेक गोष्टींचा मागें विचार केला आहे. या भागांत शिस्तीविषयी मात्र विचार कर्तव्य आहे. असो. प्रवर्तकशक्तीस शिक्षण देतांना या शक्तीची वाढ कसकशी होत जाते या गोष्टीकडे शिक्षकानें लक्ष द्यावे. बुद्धीचा व उच्च भावनांचा विकास केल्याने ही शक्ति प्रबल होते. बालोद्यान, वस्तुपाठ वगैरे विषयांचाहि योग्य उपयोग करावा. मुलांना कृति करण्याची व दुसऱ्याचे अनुकरण करण्याची फार हौस असते; ही त्यांची हौस भागविण्यास हे विषय फार चांगले आहेत.
 शिस्तः -अध्यापन, व्यवस्था, शिक्षकाचे मुलांवर असणारे एक प्रकारचे वजन व अधिकार चालविण्याचे नियम, मुलांचे नियमानुरूप वर्तन, त्यांना करण्यात येणारी शिक्षा इत्यादि सर्व गोष्टींचा शिस्त या एका शब्दांत समावेश होतो. थोडक्यात सांगावयाचें म्हणजे ज्यास आपण शिस्त हे नांव देतों तें नैतिक शिक्षण देण्याचे साधन होय असें म्हटल्यास हरकत नाही.
 शिस्त या शब्दांत आज्ञाधारकपणाचा समावेश होतो व आज्ञाधारकपणास आत्मसंयमनाची आवश्यकता असते; तेव्हां अध्यापनाचे काम सुरळीत होण्यासाठी प्रथम मुलांना आज्ञाधारकपणा शिकविला पाहिजे. आज्ञाधारकपणाचे दोनतीन प्रकार आहेतः- शिक्षेचे धाकाने किंवा बक्षिस वगैरे लालुचीनें मुलांस आज्ञा पाळावयास लावितां येते; परंतु हा खरा आज्ञाधारकपणा नव्हे ही एक प्रकारची गुलामगिरीच १४